बदला अन् संपत्तीचा हव्यास, ४ वर्षीय पुतण्याचा विहिरीत फेकून खून; सख्ख्या काकूचे कृत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 08:09 PM2024-08-16T20:09:51+5:302024-08-16T20:11:27+5:30
माटेगाव येथील बालकाच्या मृत्यू प्रकरणाचे कोडे उलगडले, थरारक घटनाक्रम आला समोर
देवगाव रंगारी : गेल्या आठवड्यात चार वर्षीय सार्थक सागर जाधव या बालकाचा मृतदेह विहिरीत संशयितरीत्या आढळला होता. तो खेळताना विहिरीत पडला असावा, असा कयास बांधला जात होता. मात्र, सदरील बालकाचा त्याच्या सख्ख्या काकूनेच बदला व संपत्तीच्या हव्यासापोटी विहिरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात सोमवारी उघड झाले आहे. या घटनेमुळे कन्नड तालुक्यात खळबळ उडाली आहे. सुनीता गणेश जाधव असे क्रूरकर्मा काकूचे नाव आहे.
माटेगाव येथील गट नं. १७ मधील शेतवस्तीवर गणेश हिरामण जाधव व सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात. या दोघांना वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. मोठा भाऊ गणेश याच्या पत्नीचे नाव सुनीता असून, त्यांना दोन मुले आहेत. तर लहान भाऊ भाऊ सागर यास एक मुलगी व मुलगा सार्थक होता.
काही दिवसांपूर्वी सागर यांचा मुलगा सार्थकने खेळताना गणेश यांच्या मुलाच्या डोळ्यात चुना टाकला. यामुळे त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. या घटनेपासून सुनीताच्या मनात चार वर्षीय सार्थकबद्दल प्रचंड राग होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सागर यांच्या पत्नीचे ऑपरेशन करून गर्भपिशवी काढून टाकण्यात आली. भविष्यात तिला मूलबाळ होणार नाही, याची जाणीव सुनीताला झाली होती. त्यामुळे सार्थकला संपविले, तर बदलाही पूर्ण होईल व सर्व शेती आपल्या मुलांना मिळेल. असा विचार सुनीताच्या डोक्यात आला. तेव्हापासून ती संधी शोधत होती. ३१ जुलै रोजी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास सागर व त्यांची पत्नी दोघे शेतात गेले होते. तर त्यांची मुलगी शाळेत गेली होती. सार्थक घरात एकटाच होता. ही संधी साधून सुनीताने चिमुकल्या सार्थकला उचलून नेत घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिले. यातच बुडून सार्थकचा मृत्यू झाला.
दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
सार्थकला विहिरीत फेकून दिल्यानंतर काही झालेच नाही, असे दाखवून सुनीता घरी आली. काही वेळाने सागर जाधव घरी आले, तेव्हा त्यांना सार्थक घरात दिसला नाही. सर्व कुटुंबीय त्याला शोधण्याच्या कामाला लागले. तेव्हा सुनीताही त्याला शोधत होती. शेवटी देवगाव रंगारी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी १ ऑगस्ट रोजी सार्थकचा मृतदेह विहिरीत आढळला.
तपासादरम्यान सुनीतावर संशय
सार्थकचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी त्याचा घातपात झाल्याच्या संशयावरून तपास सुरू केला. तेव्हा सार्थकची काकू सुनीता गणेश जाधवचे वागणे संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला तिने मला काही माहीत नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच तिने हे कृत्य केल्याचे कबूल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि. संदिप राजपूत करीत आहेत.