कंपनीला ४० कोटींचे दान
By Admin | Published: November 14, 2014 12:51 AM2014-11-14T00:51:33+5:302014-11-14T00:57:22+5:30
विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे.
विकास राऊत, औरंगाबाद
महापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे.
कंपनी आणि मनपाच्या ७९२ कोटींच्या करारात या रकमेचा कुठेही समावेश नाही. कंपनीला ही जलवाहिनी फुकटात मिळाली आहे. सप्टेंबर २०११ मध्ये झालेल्या कन्सेशन अॅग्रीमेंटपूर्वी ४० कोटी रुपयांतून ती योजना मनपाला मंजूर झाली होती. तरीही ती रक्कम पालिकेने करारातून वजा केलेली नाही. १ सप्टेंबरपासून कंपनी शहराला पाणीपुरवठा करीत आहे.
राज्य शासनाने २००९ मध्ये सुजल निर्मल या योजनेंतर्गत ४० कोटी रुपयांचा विशेष निधी पाणीपुरवठ्यासाठी दिला होता़ त्यातून मनपाने कांचनवाडी ते ज्युबिली पार्कपर्यंत ८०० मि़मी़ व्यासाच्या जलवाहिनीचे काम सुरू केले़ ते काम हायड्रोक्लोरिक डिझाईन न करता पूर्ण केले आहे़
मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे ती जलवाहिनी वॉटर हॅमरिंगने (वेगाने पाणी आदळणे) वारंवार फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जलवाहिनीला वरद गणेश मंदिराजवळ मोठा बेंड लावण्यात आला आहे़ तेथे पूर्वीची ७०० मि़मी़ची जलवाहिनी गेलेली आहे़ त्याच जलवाहिनीच्या बॅरिगेट्सवर नवीन जलवाहिनी ‘रेस्ट’ करण्यात आली आहे़ त्या ठिकाणी ‘भूमितीचे’ सर्व निकष डावलून काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कांचनवाडी ते ज्युबिलीपार्कपर्यंत ७५० मि.मी़ व्यासाची जलवाहिनी असताना ४० कोटी रुपयांची जलवाहिनी सुजल निर्मलमधून फक्त आणि फक्त समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीसाठी गिफ्ट म्हणून टाकण्यात आली. १२ वॉर्डांना त्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणार आहे. कंपनीने अजून इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे काहीही काम सुरू केले नाही.
शासनाने देऊ केलेली एवढी मोठी रक्कम एकाच जलवाहिनीवर खर्ची घालण्याचे काम मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले़ विशेष म्हणजे ती रक्कम समांतर जलवाहिनीच्या करारातून वगळली नाही़ दरम्यान, नाव न सांगण्याच्या अटीवर उपअभियंत्यांनी सांगितले की, त्या जलवाहिनीचे काम तांत्रिकदृष्ट्या ८०० ते ५०० मी़मी़च्या आकारात झाले आहे. समांतरच्या करारात या रकमेचा समावेश नाही.
दीड वर्षापूर्वीच जलवाहिनीचे काम झाले होते. मात्र, पाणीपुरवठा विभागाने तिचे तोंड उघडले नाही. त्यामुळे विद्यापीठ व नंदनवन कॉलनी परिसरात उच्च दाबाने कधीही पाणीपुरवठा झाला नाही. समांतरसाठी त्या जलवाहिनीचे तोंड बंदच ठेवले. योजना हस्तांतरित झाल्यानंतर जलवाहिनीचे तोंड उघडले? या बदमाशगिरीमुळे नागरिकांना दीड वर्ष पाण्यासाठी भटकावे लागले.
मुंबईच्या एसएमसी या कंत्राटदार संस्थेने योजनेचे काम केले आहे़ कंत्राटदाराने डिझाईन देणे गरजेचे होते़ मात्र, तसे न झाल्यामुळे वरद गणेश मंदिराजवळ ती जलवाहिनी अतिशय कमी जागेतून टाकण्यात आली. भूसंपादनाची कुठेही गरज भासू नये यासाठी तो खटाटेप केला. अंतर्गत खोदकाम करून ती जलवाहिनी टाकल्यामुळे तिच्यात घाण साचली.