कनेरगाव नाका येथे ४० किलो गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:13 AM2017-09-10T00:13:30+5:302017-09-10T00:13:30+5:30
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे कारसह ४० किलो गांजा व दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली/ कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे कारसह ४० किलो गांजा व दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली.
कनेरगाव नाका येथून कारमध्ये गांजा नेला जात असल्याची माहिती चौकीतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कनेरगाव चौकीचे पोहेकॉ सुनील खिल्लारे, श्याम खुळे, मोहन धाबे, पंडित तारे यांनी अकोला - नांदेड महामार्गावर वाहनाची तपासणी केली. तेव्हा कार क्र. एमएच 0२-केए-३६६५ मधून गांजा नेला जात असल्याचे आढळून आले. तर कारचालकाकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून संशय बळावल्याने डिकी उघडून पाहिली. तेव्हा तब्बल ४० किलो गांजा आढळून आला. या कारमध्ये दोघे होते. रियाजोद्दीन गैसोद्दिन सय्यद (३५) रा.अकोट, जि.अकोला व मो. राजिक मो.अकिल मन्सुरी (३१) रा.वलगाव रोड, अमरावती हे दोघे या कारमध्ये होते. कारसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या आरोपींना गोरेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच होणार असल्याचे खुळे यांनी सांगितले.