मनपा कर्मचाऱ्यांना ४० लाखांचे अग्रिम
By Admin | Published: October 17, 2014 11:33 PM2014-10-17T23:33:46+5:302014-10-17T23:55:32+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा दिवाळसण आनंदात जाणार आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा दिवाळसण आनंदात जाणार आहे. मनपा प्रशासनाने ४० लाख रुपये इतकी रक्कम दिवाळसणासाठी अग्रिम म्हणून देण्याचा निर्णय आज घेतला. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे बोनसकडे लक्ष लागले आहे.
आयडीबीआय आणि एचडीएफसी बँकेत ४० लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. दोन दिवसांत ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या हाती पडेल. वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये अग्रिम मिळेल.
कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर रोजी वेतन करण्यात आले. ११ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम पालिकेने अदा केली. दीड हजार कर्मचाऱ्यांना २,४७५ रुपये दिवाळी बोनस मिळण्याबाबत अजून अनिश्चितता आहे. कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विचार २१ आॅक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. ठेकेदारांचे ३२ कोटी रुपये, सप्टेंबरमधील वेतन आणि कर्जहप्ते व समांतरची देणी मिळून ५६ कोटी रुपये मनपाला लागणार आहेत. त्यातच बोनस व अग्रिम मिळून अंदाजे दीड कोटी रुपये लागतील. गेल्या दिवाळीला ४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना बोनस व अग्रिम रक्कम अदा करण्यात आली होती. वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांना ५ हजार अॅडव्हान्स, दैनिक वेतनावरील व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १ हजार दिवाळी भेट दिली होती. महिला बचत गट आणि लिंक वर्कर्सला २ हजार दिवाळी भेट, तर दैनिक वेतनावरील वर्ग- ३ च्या कर्मचाऱ्यांना ३ हजार अॅडव्हान्स दिले होते. आज पालिकेने फक्त तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तिजोरीत १८ कोटी रुपयांची रक्कम आहे.