छत्रपती संभाजीनगरात आल्या ४० लाख वह्या; दोन महिन्यांत होणार १३ कोटींची उलाढाल
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 22, 2023 12:35 PM2023-04-22T12:35:36+5:302023-04-22T12:36:14+5:30
नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी जोरात
छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षाला जून महिन्यापासून सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने शालेय साहित्यांच्या बाजारपेठेत मोठ्या उलाढालीला सुरुवात झाली आहे. आजघडीला ४० लाख वह्या, रजिस्टर शहरात दाखल झाली आहेत. त्यांची किंमत १५ कोटींच्या आसपास आहे. पुढील ‘मे व जून’ या महिन्यांत ८० टक्के वह्या विक्री होतील. म्हणजेच १३ कोटींची उलाढाल या काळात होईल.
मुंबई, जालनातील उत्पादकांच्या वह्या
४० लाख वह्या, रजिस्टर बाजारात आले आहेत. यातील ही ८० टक्के वह्या, रजिस्टर हे मुंबईहून, तर उर्वरित २० टक्के वह्या जालन्यातील उत्पादकांकडून आणण्यात आल्या आहेत. मुंबईतील नामांकित उत्पादकांच्या वह्या शहरात जास्त विकल्या जातात.
६० दिवसांत ३२ लाख वह्या
जिल्हा व्यापारी महासंघाचे सहसचिव सुनील अजमेरा यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला २ डझन वह्या घ्याव्या लागतातच. ४० लाख वह्या बाजारात आल्या असल्या तरी पुढील ६० दिवसांत यातील ३२ लाख वह्या विकल्या जातील. त्यानंतर शिल्लक ८ लाख वह्या दिवाळीपर्यंत विकतील.
२० टक्कांपर्यंत वाढल्या किमती
कागद्याच्या किमती वाढल्याने वह्यांच्या किमती २० टक्यांपर्यंत वाढल्या आहेत.
वह्या व रजिस्टरचे बाजारातील साधारण भाव असे.
किती पानी वही एप्रिल २०२२ (प्रतिनग) एप्रिल २०२३
१०० पानी वही २५ रु. -------३० रु.
२०० पानी वही ५० रु. ------६५ रु.
२०० पानी रजिस्टर ६० रु. -----७५ रु
यंदा पाने तेवढीच ठेवली, किमती वाढविल्या
दरवर्षी पाने कमी करून वह्यांच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न उत्पादक करीत असतात. मात्र, आता पाने आणखी कमी करता येत नाही, यामुळे यंदा पाने तेवढीच ठेवून किमती वाढविण्यात आल्या आहेत.
खाकी रंगाच्या मुखपृष्ठाला मागणी
पूर्वी वह्यांच्या मुखपृष्ठावर कार्टून, वाहनाचे, निसर्गाचे छायाचित्र असे. त्यावर खाकी रंगाचे कव्हर घातले जात. मात्र, आता खाकी रंगाच्या कव्हर सारखे प्रिंटच मुखपृष्ठावर असते.
२०० पानी रजिस्टरच सुपर हिट
१०० पानी वह्यांपेक्षा २०० पानी रजिस्टर सुपर हिट आहेत. कारण, शाळा असो वा खासगी शिकवणी, दोन्ही ठिकाणी २०० पानांचे रजिस्टर चालते. यामुळे ७० टक्के रजिस्टर, तर ३० टक्के वह्या विकल्या जातात.
स्टेपल बँडिंग
पूर्वी वह्यांना दोऱ्याची बांधणी केली जात होते. मात्र, आता स्टेपल बँडिंगचा जास्त वापर केला जात आहे. यामुळे वह्यांची पाने वेगवेगळी होत नाहीत, असे उत्पादकांचे म्हणणे आहे.