छत्रपती संभाजीनगरात कारमध्ये आढळलेली ४० लाखांची रोकड जप्त
By बापू सोळुंके | Published: November 7, 2024 06:25 PM2024-11-07T18:25:43+5:302024-11-07T18:26:52+5:30
औरंगाबाद पूर्व विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिले रोकड जप्त करण्याचे आदेश
छत्रप्ती संभाजीनगर : गारखेडा सूतगिरणी चौकात निवडणूक आचारसंहिता तपासणी पथकाने ४० लाखाची रोकड जप्त केली. चौकशी अंती ही रक्कम एका पतसंस्थेची असल्याचे आणि अंतर्गत शाखा व्यवहाराची असल्याचे निष्पन्न झाले. मात्र संबंधित वाहनांवर क्यूआर कोड नसल्याने ही रक्कम जप्त करून कोषागार कार्यालयात ठेवण्यात आल्याची माहिती पूर्व विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली.
विधानसभा निवडणुक अत्यंत पारदर्शक व्हावी, पैशाचे अमिष दाखवून मतदान होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट सुचना केल्या आहेत. यानुसार प्रत्येक मतदारसंघात भरारी पथक आणि तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. गारखेडा सूतगिरणी चौकात असलेल्या तपासणी पथकाने आज एका कारमध्ये मोठी रोकड आढळून आली. ही बाब समजताच निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासह अन्य अधिकारी तेथे दाखल झाले. कारचालक सचीन सुरसिंग जाधव यांच्या चौकशी अंती ही रक्कम बिडकीन येथील व्यंकटेश मल्टी स्टेट को ऑपरेटीव सोसायटीची असल्याचे स्पष्ट झाले. पतसंस्थेच्या आंतरशाखा व्यवहाराकरीता ही रक्कम नेली जात असल्याचे चौकशीतून दिसून आले.
परंतु, आदर्श आचारसंहितेत रकमेची हस्तांतरण करताना क्यूआर कोड नसल्याने ही रक्कम जप्त करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयाकडे देण्यात आल्याचे गिरासे यांनी सांगितले. ही कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी गिरासे, नोडल अधिकारी प्राजक्ता वंजारी यांच्या मागर्दशनाखाली तपासणी पथकाचे नसीम शेख एकनाथ पडूळ,सचीन सोनी, श्याम उदावंत, पोलीस कर्मचारी इंदलसिंग महेर आणि व्हिडिओग्राफर आदींचा समावेश होता.