४० कोटींचा चिनी माल औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:14 AM2017-08-15T00:14:36+5:302017-08-15T00:14:36+5:30
भारत व चीनमधील तणावाचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेतही जाणवू लागला आहे. सोशल मीडियावर ‘नो चायनिज’ ही मोहीम जोर धरते आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारत व चीनमधील तणावाचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेतही जाणवू लागला आहे. सोशल मीडियावर ‘नो चायनिज’ ही मोहीम जोर धरते आहे. या जनजागृतीमुळे ग्राहकही ‘मेड इन चायना’ वस्तू घेण्याचे टाळत आहे. लोकभावना व देशप्रेमामुळे व्यापाºयांनीही आता चिनी वस्तू मागविणे कमी केले आहे; परंतु सध्या बाजारपेठेत सुमारे ४० कोटी रुपयांच्या लहान-मोठ्या हजारो चिनी वस्तूंचा स्टॉक पडून आहे. त्याचे काय करायचे, असा यक्ष प्रश्न व्यापाºयांना पडला आहे.
चीनने पाकिस्तानी दहशतवाद्यास पाठिंबा दिल्यापासून देशात चीनविरोधी जनभावना निर्माण होऊ लागली आहे. मागील दोन महिन्यांत डोकलाम मुद्दावरून चीनने भारतावर डोळे वटारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आपले सैन्य जसे सीमेवर लढत आहे त्याप्रमाणे नागरिकांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात योगदान द्यावे, असे आवाहन करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा परिणाम सध्या बाजारपेठेवर दिसतो आहे. कल्पकता व नावीन्यतेच्या आधारावर ड्रॅगनने २००० साली बाजारपेठेत मुसंडी मारली होती. आता कॉम्प्युटर, टीव्ही, फर्निचरपासून ते अगरबत्तीपर्यंत ‘मेड इन चायना’ने दबदबा निर्माण केला आहे. आजघडीला बाजारपेठेत विविध क्षेत्रांत मिळून सुमारे ४० कोटी रुपयांचा चिनी माल शिल्लक असल्याचा अंदाज जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी वर्तविला.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये चिनी भाग
इलेक्ट्रॉनिक्समध्ये टीव्हीपासून मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, सोलार वॉटर गीझरपर्यंत सर्वच उपकरणांत ७० ते ८० टक्के चिनी बनावटीचे सुटे भाग आहेत, तसेच ८० टक्के मोबाइल अॅक्सेसरीज चीनच्याच आहेत. चीनमधून इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आणून अनेक उत्पादक आपल्या देशात असेंम्बल करतात. चिनी मोबाइलवर बहिष्कार टाकता येईल; परंतु प्रत्येक उपकरणातील चिनी भाग कसे हटविता येतील, असा प्रश्न वितरकांनी उपस्थित केला.
२६ जानेवारीला शहरात चिनी बनावटीचे तिरंगी ध्वज आले होते. आता १५ आॅगस्टसाठी सजावटीच्या वस्तूंनी दुकाने फुलली आहेत. यात चिनी बनावटीचे तिरंगी ध्वज गायब झाल्याचे दिसते.
ग्राहकही भारतीय बनावटीचे साहित्य द्या, अशी मागणी करताना दिसतात.