४० टक्के धान्य लॅप्स !
By Admin | Published: June 28, 2014 11:44 PM2014-06-28T23:44:35+5:302014-06-29T00:37:29+5:30
आशपाक पठाण , लातूर अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल आदींसाठी शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे स्वस्त धान्य जून महिन्यांत लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे़
आशपाक पठाण , लातूर
अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल आदींसाठी शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे स्वस्त धान्य जून महिन्यांत लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे़ तर दुसरीकडे धान्य देणार कधी, या चौकशीसाठी दुकानदारांचे पुरवठा विभागाकडे खेटे सुरू आहेत़ २० तारखेपर्यंत धान्य उचलले नसल्यामुळे ४० टक्के धान्य लॅप्स झाल्याची माहिती समोर आली आहे़ यात चूक नेमकी कोणाची? या विषय संशोधनाचा बनला आहे.
अन्न सुरक्षा योजनेमुळे स्वस्त धान्य दुकानांत खरेदीसाठी लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे़ एपीएलधारकांचे धान्य उचलल्याशिवाय अन्न सुरक्षा योजनेतील धान्य मिळत नसल्याची ओरड आहे़ महिन्याच्या शेवटी दरमहा स्वस्त धान्याचे वितरण केले जाते़ जून महिन्यातील धान्याचा जवळपास ४० टक्के कोटा लॅप्स झाल्याने लातूर, अहमदपूर, निलंगा या तीन तालुक्यांत लाभार्थ्यांची ओरड वाढली आहे़ काही ग्राहक स्वस्त धान्य दुकानदारांशी हुज्जत घालत असल्याची ओरड आहे़ शासनाकडून मिळालेच नसल्याने धान्य नेमके द्याचे कोठून, असा प्रश्न विके्रत्यांना पडला आहे़ जिल्ह्यात दरमहा ९ हजार ५०० मेट्रिक टन धान्य वाटप केले जात असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या दप्तरी नोंद आहे़ एफसीआयच्या गोदामातून दरमहा धान्य उचलावे लागते़ मात्र, जून महिन्यात कंत्राटदार व हमालांनी संप केल्याने वेळेत धान्य उचलण्यात आले नाही़ त्यामुळे ४० टक्के धान्याचा कोटा लॅप्स झाल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली़
जळकोट, देवणी, औसा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर तालुक्यात जूनचे अन्नधान्य मिळाले असले तरी लातूर, अहमदपूर, निलंगा येथील लाभार्थ्यांकडून ओरड वाढली आहे़
लाभार्थ्यांची ओरड...
जिल्हा पुरवठा विभागाकडून जुनचे धान्य वाटप झाले नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांची चांगलीच गोची झाली आहे़ अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांकडून विके्रत्यांकडे वारंवार विचारणा केली जात आहे़ परंतू धान्य मिळालेच नसल्याने आम्ही तरी देणार कोठून? असा प्रश्न लातूर शहरातील एका विक्रेत्याने सांगितले़ या महिन्यात लॅप्स झालेले धान्य पुन्हा पुढच्या महिन्यात मिळणे शक्य नाही़ अन्न सुरक्षेमुळे स्वस्त धान्य लाभार्थ्यांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे़ मात्र सध्या धान्यच मिळाले नसल्याने गरजूंची गैरसोय होत आहे़
दिल्लीतून मिळणार मुदतवाढ़़़़
दरमहा २० तारखेपर्यंत धान्य उचलावे लागते़ या महिन्यात हमाल-कंत्राटदारांनी संप केल्याने वेळेत धान्य उचलण्यात आले नाही़ ४० टक्के धान्य लॅप्स होण्यास संबंधित वाहतूक ठेकेदार, हमाल जबाबदार आहेत़ एपीएलचे धान्य अगोदर उचलावे लागते़ मात्र ठेकेदाराने वाहने पुरविली नाहीत़ त्यामुळे धान्य लॅप्स झाले आहे़ यापूर्वी एफसीआयच्या पुणे कार्यालयातून लॅप्स झालेले धान्य एका दिवसांत मिळत होते़
लॅप्स झालेले धान्य मिळणार का..?
आता ही प्रक्रिया दिल्लीतून सुरू झाल्याने जवळपास आणखी ४ ते ५ दिवस उशीर लागणार असून लॅप्स झालेले ४० टक्के धान्य मिळणार आहे़ त्यातून अहमदपूर, लातूर, निलंगा तालुक्याला पुरवठा केला जाणार आहे़ या तीन्ही तालुक्यांतील अंत्योदय लाभार्थ्यांचे धान्य देण्यात आल्याचे पुरवठा विभागातील पेशकार घुगे यांनी सांगितले़