'अभ्यासक्रम ४० टक्के ऑनलाईन, तर ६० टक्के ऑफलाईन'; संमिश्र शिक्षण पद्धत राबविण्याचा ‘यूजीसी’चा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 07:56 PM2021-05-25T19:56:39+5:302021-05-25T19:57:20+5:30
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत.
औरंगाबाद : उच्च शिक्षणामध्ये यापुढील काळात विद्यापीठे व महाविद्यालयांनी ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन, तर ६० टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने शिकविण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला असून विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. या संमिश्र शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईन व फेस टू फेस अध्यापन पद्धत राबविण्याची तरतूद करण्यात आली. ही तरतूद शिक्षकांना संभ्रमात टाकणारी आहे, असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात, या पद्धतीनुसार शिक्षकांनी दोन दिवस घरी बसून आणि चार दिवस कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचे का, हे स्पष्ट होत नाही. आम्ही ऑनलाईन तासिका घेतो तेव्हा बहुतांशी विद्यार्थी या तासिकांमध्ये सहभागी होत नाहीत. ऑनलाईन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यास संधी आहे. त्यामुळे हे धोरण प्रभावी ठरणारे नाही. दुसरीकडे, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे यांनी मात्र, या धोरणामुळे सर्वांना शिक्षण मिळेल. शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. अभ्यासक्रम, प्रात्याक्षिके व परीक्षा ऑनलाईन घेतल्यास कोणी कोठूनही परीक्षा देऊ शकेल व शिक्षणही घेऊ शकेल.
दुसरीकडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी मात्र ‘यूजीसी’चे हे धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मारक ठरेल, अशी भूमिका मांडली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या तेव्हा ८० टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला पसंती दर्शवली. या शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान हा घटक महत्त्वाचा मानला आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे आधुनिक साधनांची वाणवा आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ऑनलाईन अध्यापन व परीक्षेपासून वंचित राहतील. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हे धोरण उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.
विद्यार्थी संघटना काय म्हणतात...
‘यूजीसी’ने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना वर्गात बसून शिकता येईल. दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव कधी संपुष्टात येईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे ४० टक्के ऑनलाइन व ६० टक्के ऑफलाइन पद्धतीनेच शिकवले गेले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
- निकेतन कोठारी, अभाविप
गुरुकुल शिक्षण पद्धतीला संपविण्याचा प्रयत्न
प्रत्येकाला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही. या शिक्षण पद्धतीमुळे आपल्याकडील प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य देशात ऑनलाइन शिक्षण पद्धती प्रभावी ठरली आहे. कारण, त्यांना तिकडे तेवढी साधने उपलब्ध आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे आपल्याकडील गरीब, वंचित विद्यार्थ्यांच्या हातून शिक्षण हिसकावून घेण्यासारखे आहे.
- प्रकाश इंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन