अजिंठा बँकेच्या ४० हजार ठेवीदारांचा जीव टांगणीला; विम्याच्या दाव्याचा फॉर्म घेण्यासाठी गर्दी
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 1, 2023 08:33 PM2023-09-01T20:33:56+5:302023-09-01T20:35:16+5:30
अजिंठा अर्बन बँकेत मोठी रक्कम गुंतली, पण बोलण्यास कोणी धजावेना
छत्रपती संभाजीनगर : आरबीआयने शहरातील २५ वर्षे जुनी अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील काही व्यवहारावर निर्बंध आणल्याने ४० हजार ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निर्बंधानंतर हजारो ग्राहकांनी बँकेत येऊन ‘आमच्या पैशांचे पुढे काय होणार’ असा प्रश्न व्यवस्थापकांना विचारला. लाखो नव्हे तर काही ग्राहकांनी कोटी रुपये बँकेत ठेवल्याचे सांगितले जात होते.
व्याजावर जगणाऱ्या जेष्ठांचा घाबरलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. ‘पैशाविना आता जगायचे कसे,’ असा यक्षप्रश्न या ज्येष्ठांना पडला आहे.
अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सकाळी उघडली त्याआधीच शेकडो ठेवीदार बँकेबाहेर उभे होते. आरबीआयने कशामुळे बँकेवर निर्बंध आणले हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला आमचे पैेस परत द्या, अशी एकच मागणी अनेक ठेवीदार करीत होते. विम्याच्या दाव्यासाठी फॉर्म घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. फॉर्म घेणाऱ्यांची एवढी संख्या होती की, बँक कर्मचाऱ्यांना अनेकदा झेरॉक्स कॉपी काढाव्या लागल्यात. संध्याकाळी ५ वाजेनंतर बँकेचे मुख्य गेट बंद केल्यानंतरही खातेदार पाठीमागील गेटने बँकेत जात होते व फॉर्म घेत होते. काहीजण चौकशीसाठी येत होते. व्यवस्थापक सर्वांची समजूत काढण्यात व्यस्त होते. काही संतप्त ठेवीदार आपला संताप कर्मचाऱ्यांवरही काढत होते.
ठेवीची कुटुंबात विभागणी
अनेकांच्या लाखो रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत. त्या कोणाच्या १० लाख, कोणाचे १५ लाख, कोणाचे ६० लाख रुपयांच्या ठेवी, तर काहीजणांच्या कोट्यवधींच्या ठेवी आहेत. विम्याची रक्कम ५ लाखापर्यंत मिळणार असल्याने अनेक ठेवीदार आपली ठेवीतील रक्कम आपली मुलगी, मुलगा, पत्नीच्या नावावर करण्यासाठी आले होते. ठेवीची रक्कम विभागली जात होती. जेणेकरून सर्वांना ५ लाखापर्यंतचा विमा दावा करता येईल व गुंतवलेली सर्व रक्कम मिळेल.
आता जगायचे कसे?
एक ज्येष्ठ महिला आपल्या मुलीसह बँकेत आली होती, तिच्या पतीचे ५ वर्षांपूर्वी निधन झाले. घर विकून आलेले १० लाख रुपये त्यांनी बँकेत ठेवले होते. त्यातून येणाऱ्या व्याजावरच तिचे घर चालत होते. आता व्याजसुद्धा मिळणार नाही. यामुळे आम्ही कसे जगायचे, या वयात कोणा समोर हात पसरावयाचे, अजून मुलीचे लग्न करायचे आहे. आता मी काय करू असे म्हणत असताना त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपण फसले गेलो अशी भावना तिच्यात निर्माण झाली होती. मात्र, तिने नाव देण्यास नकार दिला.
झांबड साहेबांकडे पाहून बँकेत ठेवी ठेवल्या
बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड साहेब यांच्यावर लोकांचा मोठा विश्वास. यामुळे आम्ही त्यांच्याकडे पाहून आमच्या लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. आम्हाला आजही संपूर्ण विश्वास आहे की, ते आम्हाला आमची रक्कम पुन्हा परत देतील, असेही काही ठेवीदार सांगत होते.
३५० कोटींचे कर्ज वाटप
अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ४० हजार खातेदार आहेत. त्यांनी सुमारे ४२१ कोटी रुपये बँकेत जमा केले. बँकेने ३५० कोटीचे कर्ज वाटप केले. व्यवस्थापकांनी असे सांगितले की, यात ९० ते ९५ टक्के खातेदार असे आहेत की, त्यांच्या खात्यात ५ लाखापेक्षा कमी ठेवी आहेत. तर ५ ते १० टक्के खातेदारांचे ५ लाखांपासून ते कोट्यवधींच्या ठेवी आहेत. विम्याच्या दाव्यापोटी ५ लाखांपर्यंतची रक्कम खातेदारांना मिळेल. त्यासाठी विम्यासाठीचे अर्ज भरून घेतले जात आहे. ही विम्याची रक्कम ४५ ते ९० दिवसांत मिळेल, अशी माहिती कर्मचारी खातेदारांना देत होते.
आदर्श बँक खातेदारांप्रमाणे आमचे हाल होतात की काय...?
बँकेबाहेर रस्त्यावर काही खातेदार चर्चा करताना दिसून आले. आदर्श बँकेतील खातेदारांचे जसे हाल झाले. तसे आपलेही होतील की काय, असा प्रश्न त्यांना पडला होता. जीवनाची कमाई बँकेत अडकल्याने ‘घरात’ही बसवत नाही, असे एका खातेदाराने सांगितले. मात्र, वर्तमानपत्रात आमचे नाव आले तर बँकचे अधिकारी आम्हाला त्रास देतील, असे म्हणत त्यांनी नाव देण्यासही इन्कार केला.