सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज ४० हजार युनिट वीजनिर्मिती; अखंड वीजेमुळे शेतकऱ्यांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 06:36 PM2024-09-18T18:36:46+5:302024-09-18T18:36:51+5:30
भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : पीक उत्पादक शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसभरात पूर्ण क्षमतेने अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील भादली व धोंदलगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमधून ४० हजार युनिट वीजनिर्मिती होत असून, याद्वारे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील भादली व धोंदलगाव येथे सौर उर्जा प्रकल्प उभारला आहे. यासाठी भादली प्रकल्पासाठी १८ कोटी व धोंदलगावसाठी १२ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. आता हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले असून, भादली प्रकल्पातून दरराेज ५ मेगावॅट (२५ हजार युनिट) व धोंदलगाव प्रकल्पातून रोज ३ मेगावॅट (१५ हजार युनिट) वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्राप्त वीजसाठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित स्वरूपात वीजपुरवठा मिळत असल्याने त्यांच्यासाठी हा सौरऊर्जा प्रकल्प मोठा उपयुक्त ठरला आहे. जवळपास २० गावांतील कृषी पंपधारक ग्राहकांना या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विभाग दोन यांच्या कार्यक्षेत्रातील भादली उपकेंद्रासाठी १४ हेक्टर व धोंदलगावसाठी १३ एकर जमिनीमध्ये केंद्र सरकारच्या EESL, तसेच राज्य सरकारच्या MSEDCL मार्फत या प्रकल्पांची उभारणी करण्यात आली.
भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर राज्य सरकारने दिलेल्या या प्रकल्पांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळत असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वैजापूर तालुक्यातील या गावांना होतो वीजपुरवठा
भादली सौर उर्जा प्रकल्प : भादली, तलवाडा, पाराळा, मन्याड, चिकटगाव, वडजी
धोंदलगाव प्रकल्प : धोंदलगाव, मालेगाव, जमनवाडी, अमनाथपूरवाडी, बाभूळगाव, पाथरी, राहेगाव, संजरपूरवाडी