शहरात कोरोनाकाळात ४ हजार लग्नांचा उडाला बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:02 AM2021-04-17T04:02:26+5:302021-04-17T04:02:26+5:30

औरंगाबाद : कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असतानाही मागील पाच महिन्यांत शहरात तब्बल ४ हजार ११ लग्नसोहळे पार पडले. ...

4,000 weddings in the city during the Corona period | शहरात कोरोनाकाळात ४ हजार लग्नांचा उडाला बार

शहरात कोरोनाकाळात ४ हजार लग्नांचा उडाला बार

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असतानाही मागील पाच महिन्यांत शहरात तब्बल ४ हजार ११ लग्नसोहळे पार पडले. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याने लग्नसराईत किती लग्न लागतात याची अचूक आकडेवारी पहिल्यांदाच समोर आली आहे.

शहरात दरवर्षी किमान ६ हजारांपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यावेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्नसोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले महापालिका व पोलीस आयुक्तालयाची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्नसोहळे पार पडले जाऊ लागले. मात्र, काही लग्नसोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू- वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून शहरात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. पोलीस आयुक्तालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार पाच महिन्यांत शहरात ४ हजार ११ लग्नसोहळ्यांना परवानगी देण्यात आली.

विवाहप्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला. यामुळे ४० कोटी ते ६० कोटींदरम्यान उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

चौकट

चालू महिन्यातील लग्नतारखा ढकलल्या पुढे

शहरात लहान, मोठी २५० च्या जवळपास मंगल कार्यालये, लॉन आहेत. त्यातील ४० मंगल कार्यालये संघटनेचे सदस्य आहेत. ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ४ ते ५ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे २०० पेक्षा अधिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

-प्रशांत शेळके,

अध्यक्ष, मंगल कार्यालय संघटना

चौकट

४७० जणांनी केले रजिस्टर्ड मॅरेज

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलविण्यापेक्षा सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीविवाह करण्याचा निर्णय काही वधू- वरांनी घेतला. मागील वर्षभरात ४७० जणांनी नोंदणी विवाह केल्याची माहिती विवाह अधिकाऱ्यांनी दिली.

चौकट

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत.

Web Title: 4,000 weddings in the city during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.