‘संत एकनाथ’च्या फडात ४१ उमेदवार
By Admin | Published: June 21, 2016 01:01 AM2016-06-21T01:01:03+5:302016-06-21T01:09:53+5:30
पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५८ उमेदवारांनी
पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले असून आता निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार राहिले आहेत. मंगळवारी (दि.२१) उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीराम सोन्ने यांनी दिली.
उमेदवारी अर्ज परत घेण्याची सोमवारी अंतिम मुदत असल्याने आमदार संदीपान भुमरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, तालुकाप्रमुख अण्णाभाऊ लबडे, राजेंद्र पा. शिसोदे, नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे हे या निवडणुकीत एकत्र आले असून ते अडचणीच्या ठरू शकणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याच्या प्रयत्नात होते, तर दुसऱ्या गटाकडून भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार पा. शिसोदे, माजी आमदार संजय वाघचौरे, सचिन घायाळ, अप्पासाहेब रामकृष्ण पाटील यांच्या उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी राजकीय हालचाली सुरू होत्या. रिंगणात राहिलेल्या उमेदवाराच्या संख्येवरून निवडणूक दोन पँनलमध्ये लढली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
यांनी घेतली माघार
उमेदवारी अर्ज परत घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आमदार भुमरे यांनी सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज परत घेतला असला तरी ते पाचोड गटातून निवणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, विद्यमान संचालक संभाजी सव्वासे, नंदलाल काळे, प्रा. परसराम मोरे, सुरेश दुबाले, अण्णासाहेब औटे, विठ्ठल शेळके, रतनलाल गारदे, द्वारकाबाई दोरके आदी प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी परत घेतली.
उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी यांना सहा. निबंधक श्रीराम सोन्ने, कासार, अण्णा मुळे, काळे यांनी सहकार्य केले.