चार मोठ्या प्रकल्पांत ४१ टक्के साठा
By Admin | Published: September 7, 2014 11:55 PM2014-09-07T23:55:48+5:302014-09-08T00:04:32+5:30
नांदेड : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे चार मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१़२२ टक्के पाणीसाठा आहे़
नांदेड : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे चार मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१़२२ टक्के पाणीसाठा आहे़ त्यामुळे पाणीटंचाईचे संकट आता दूर झाले आहे़
पावसाळा संपत आला तरी, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते़ तर दुसरीकडे पिण्यासाठीही पाण्याची टंचाई निर्माण झाली होती़ विष्णूपुरी जलाशयात तर फक्त ८़७३ दलघमी एवढे पाणी शिल्लक होते़ त्यामुळे शहरावर आठ दिवसाआड पाण्याची टांगती तलवार होती़
त्यानंतर मात्र २६ आॅगस्टपासून जिल्ह्यात दररोज पाऊस हजेरी लावत आहे़ त्यामुळे लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे़ सध्या इसापूर प्रकल्पात ४२९़६७७ दलघमी, लोअर मनार प्रकल्पात २९़७२१ दलघमी, अप्पर मनार प्रकल्पात २६़२३ दलघमी तर विष्णूपुरी प्रकल्पात ६४़५८ दलघमी एवढा पाणीसाठा आहे़ तर मध्यम प्रकल्पांमध्ये ५७़१६ दलघमी एवढे पाणी आहे़ त्यात आमदुरा प्रकल्प- २४़८३ दलघमी, दिग्रस-२१़८६ दलघमी, कारडखेड- ६़१३ दलघमी, कुंद्राळा- ३़३० दलघमी पाणी आहे़ तर बाभळी प्रकल्पात शून्य दलघमी पाणी आहे़ जिल्ह्यात ३१ आॅगस्ट ते १ सप्टेंबरला पहाटेपर्यंत २५़६८ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट मात्र दूर झाले आहे़ (प्रतिनिधी)