‘विश्वकर्मा’ योजनेत छत्रपती संभाजीनगरात २५ हजार अर्ज निव्वळ शिलाई मशीनसाठी
By मुजीब देवणीकर | Published: October 3, 2024 06:15 PM2024-10-03T18:15:51+5:302024-10-03T18:29:30+5:30
कर्ज स्वरूपात ही योजना असताना निव्वळ शिलाई मशीन मिळेल म्हणून शिंपी या प्रवर्गात २५ हजार महिलांनी अर्ज केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने शहरातील महिलांनी महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तब्बल ४१ हजार अर्ज दाखल केले. अर्जांची संख्या पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. योजना १८ पगड जातींच्या नागरिकांना आपला पारंपरिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी आहे. कर्ज स्वरूपात ही योजना असताना निव्वळ शिलाई मशीन मिळेल म्हणून शिंपी या प्रवर्गात २५ हजार महिलांनी अर्ज केले आहेत.
महापालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. योजनेत १८ पगड जातीच्या नागरिकांना पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना अगोदर डीआयसीमार्फत प्रशिक्षण दिले जाईल. दररोज ५०० रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जाईल. दुसरे प्रशिक्षण १५ दिवसांचे राहील. त्यातही ५०० रुपये भत्ता राहील. व्यवसाय करण्यासाठी किट दिले जाणार आहे. या शिवाय १ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के व्याजाने कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाची परतफेड केल्यास २ लाख रुपये दुसरे कर्ज मिळेल. या योजनेत मोफत शिलाई मशीन मिळणार ही अफवा पसरविण्यात आली. शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या महिला आजही मोठ्या संख्येने मनपात येऊन पाचशे ते हजार रुपये खर्च करून ऑनलाइन अर्ज भरत आहेत. मनपात येऊन ऑफलाइन अर्जही दाखल करीत आहेत.
१८ पगड जाती कोणत्या?
कुंभार, सुतार, लोहार, चांभार, माळी, तेली, न्हावी, परीट-धोबी, बोट बनविणारा, शस्त्र कारागीर, कुलूप तयार करणारा-दुरुस्ती करणारा, सोनार, शिल्पकार-दगड कोरणारा, गवंडी, बास्केट-चटई-झाडू बनविणारा-कॉयर विणकर, बाहुली-खेळणी बनविणारा, शिंपी, मासे पकडायचे जाळे बनविणारा.
२५ हजार अर्ज शिंपी प्रवर्गात
शिंपी प्रवर्गात महापालिकेकडे २५ हजार अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जावर मोफत शिलाई मशीन द्यावी, असा उल्लेख महिलांनी केला आहे. अन्य प्रवर्गात २२१४ हजार अर्ज आले आहेत.
प्राप्त अर्जांचा तपशील
४१०५३- प्राप्त अर्ज
१४१५८- तपासणी अर्ज
६४१५- विविध योजनांचा लाभ घेतला
७७४३- नाकारण्यात आलेले अर्ज
२६८९५- तपासणीस प्रलंबित अर्ज
२४६८१- शिंपी प्रवर्गातील अर्ज
२२१४- इतर प्रवर्गातील अर्ज
अर्जांची तपासणी सुरू
शासन निर्देशानुसार वॉर्ड कार्यालयाकडून संबंधित अर्जांची तपासणी करून घेण्यात येत आहे. त्यानंतर शासनाच्या पुढील निर्देशानुसार कारवाई केली जाईल.
- अंकुश पांढरे, उपायुक्त मनपा.