शहरात कचरा प्रक्रियेसाठी ४१७ खुल्या जागांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:25 PM2018-04-26T19:25:36+5:302018-04-26T19:26:18+5:30

शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या ६८ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. या काळात विभागीय आयुक्तालय, पालिकेत रोज बैठकांचे सत्र सुरू आहे.

417 open spaces for the garbage process in the city | शहरात कचरा प्रक्रियेसाठी ४१७ खुल्या जागांचा पर्याय

शहरात कचरा प्रक्रियेसाठी ४१७ खुल्या जागांचा पर्याय

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या ६८ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. या काळात विभागीय आयुक्तालय, पालिकेत रोज बैठकांचे सत्र सुरू आहे. रोज नवीन-नवीन मुद्दे समोर येत असून, ११५ वॉर्डांमधील ४१७ खुल्या जागांचा पर्याय बुधवारी समोर आला. वॉर्डातील कचरा तेथे आरक्षित जागेतच कम्पोस्ट करण्यावर भर देण्याबाबत आयुक्तालयातील बैठकीत चर्चा झाली. 

मालमत्ता विभागाकडून आरक्षित जागांची माहिती विभागीय आयुक्तालयातील बैठकीत घेण्यात आली. वॉर्डातील कचरा प्रत्येक वॉर्डातच कम्पोस्ट केला जावा, उर्वरित प्लास्टिक व इतर सुका कचरा संकलन स्वतंत्ररीत्या केले जावे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीस उपसंचालक रिता मैत्रेवार, एमपीसीबीचे जे.बी. संगेवार, शहर अभियंता एस.डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सिकंदर अली, कचरा व्यवस्थापन नियंत्रण अधिकारी, प्रभागाचे वॉर्ड अधिकारी उपस्थित होते.

आधी समजावून सांगा, नंतर दंड लावा 
कचरा  फेकून न देता, वर्गीकरण करून  स्वच्छता कर्मचाऱ्याकडे तो द्यावा.  शहरात दररोज निर्माण होणाऱ्या १०० टक्के कचऱ्याच्या निर्मितीचे विलगीकरण करावे. जमा झालेल्या विलगीकृत कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी. प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कचरा विलगीकरणासाठी माहिती,  जनजागृती करावी. विलगीकृत कचरा न देणाऱ्या कुटुंबांना समजावून सांगावे. नियमांचे पालन केले नाही, तर दंडात्मक कार्यवाही करावी. कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या हॉटेल्स, मंगल कार्यालयांसह इतर आस्थापना, अपार्टमेंटस्, घरे यांच्यावरही मनपाचे पथक, वॉर्ड अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून दंड आकारावा. रस्त्यावरील डेब्रिजदेखील उचलून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी, असे निर्देश  दिले.

उद्योजकांना घालणार साकडे 
शहर सौंदर्र्यीकरणासाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्यासाठी त्यांना साकडे घालण्यात येणार आहे. यासंदर्भात उद्योजकांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्र दिनापासून स्वच्छ शहराकडे वाटचाल होण्यासाठी ३० एप्रिल रोजी महास्वचछता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक व्यक्तीने सामाजिक जबाबदारी स्वीकारून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. भापकर यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: 417 open spaces for the garbage process in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.