४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन रंगणार औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:02 AM2021-09-04T04:02:01+5:302021-09-04T04:02:01+5:30
औरंगाबाद : देगलूर येथे आयोजित केलेले ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन रद्द केल्यानंतर ते आता २५ व २६ सप्टेंबर ...
औरंगाबाद : देगलूर येथे आयोजित केलेले ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन रद्द केल्यानंतर ते आता २५ व २६ सप्टेंबर रोजी औरंगााबादेत आयोजित केले जाणार आहे. यासाठी लोकसंवाद फाउंडेशनतर्फे ४१ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याचे दिलेले निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेने (मसाप) स्वीकारले असल्याची घोषणा अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी केली.
देगलूर येथे मार्चमध्ये आयोजित केलेले ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. आयोजक संस्थेची दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर ते रद्द करण्याचा निर्णय ‘मसाप’ने घेतला. अलीकडे लोकसंवाद फाउंडेशनने संमेलन आयोजित करण्याचे निमंत्रण ‘मसाप’ला दिले. त्यावर ‘मसाप’च्या कार्यकारिणीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यात हे निमंत्रण स्वीकारले आहे. यानंतर ‘मसाप’चे अध्यक्ष ठाले पाटील आणि ‘लोकसंवाद’चे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांच्यासह सहकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रविकिरण सावंत, सुदाम मुळे पाटील यांच्यासोबत संमेलन आयोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे संमेलन कसलाही भपकेबाजपणा न करता कमीत कमी खर्चात साधेपणाने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय कोरोनासंदर्भात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही ‘मसाप’ने आयोजकांना दिल्या आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार राहतील, असेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या संमेलनाची घोषणा करताना ठाले पाटील यांच्यासह परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे व कार्यकारिणी सदस्य डॉ. रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.