उद्योजक विवेक देशपांडेविरूद्ध ४२० दाखल, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली जमीन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 01:22 PM2021-12-24T13:22:49+5:302021-12-24T13:30:19+5:30
आरोपींमध्ये चारजणांचा समावेश
औरंगाबाद : रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक कंत्राटदार विवेक शंकरराव देशपांडे (रा. आदित्यनगर, गारखेडा) यांच्यासह चारजणांविरूद्ध बनावट लेटरहेड, शिक्के तयार करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
विवेक देशपांडे यांच्यासह गजानन रामजी बोदडे (रा. अविष्कार कॉलनी, एन ६, सिडको), गणेश गुलाबराव धुरंधर (रा. मसनतपूर, अशोकनगर, चिकलठाणा) आणि जयसिंग लक्ष्मण चव्हाण (रा. गारखेडा) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सविता निरंजन वानखेडे (रा. एन २, कामगार चौक, संत तुकोबानगर, सिडको) यांनी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. या तक्रारीनुसार प्रशिक वीट व चुना उत्पादक सहकारी संस्थेच्या करमाड शिवारातील एक एकर जमिनीचा या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. प्रशिक वीट व चुना उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी १९९३ साली झाली आहे. या संस्थेचे ११ सभासद असून, मृत ईश्वरदास विक्रम अभ्यंकर हे अध्यक्ष आहेत. सविता वानखेडे या सचिव आहेत. या संस्थेने १९९४ साली रामनाथ उर्किडे यांच्याकडून करमाड शिवारातील गट नंबर १८३मध्ये एक एकर जमीन ६० हजार रुपयांत खरेदी केली होती. तेव्हापासून ही जागा संस्थेच्या ताब्यात आहे.
संस्थेचे सभासद गणेश धुरंधर यांनी ४ ऑक्टोबर २०२० रोजी फिर्यादीचे पती रामदास अभ्यंकर यांना माहिती दिली की, संस्थेची जमीन गजानन बोदडे आणि विवेक देशपांडे यांनी संगनमताने हडपली आहे. तेव्हा फिर्यादी नागपुरात वास्तव्यास होते. ते औरंगाबादेत परतल्यानंतर संस्थेची जमीन धुरंधर, बोदडे यांनी संस्थेचे बनावट लेटरहेड, शिक्के तयार करुन विवेक देशपांडे यांना ३० सप्टेंबर २०२० रोजी विक्री केल्याचे कागदपत्रावरुन स्पष्ट झाले. फिर्यादींनी संस्थेच्या सदस्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीला सभासद बोदडे आणि धुरंधर अनुपस्थित राहिले. बनावट लेटरहेडवर सूचक व अनुमोदक म्हणून नाव असलेले सभासद शैलेश गजभिये व रामराव धाकडे यांनी बैठकीत सांगितले की, त्यांना व्यवहाराची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्या कागदपत्रावर त्यांची नावे टाकून बनावट स्वाक्षरी करून ठराव मंजूर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे बनावट कागदपत्र करताना बोदडे अध्यक्ष तर धुरंधर सचिव बनले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
८५ लाखांची जमीन १२ लाखांत खरेदी
बनावट लेटरहेड व शिक्क्यांचा वापर करून खरेदी केलेल्या जमिनीची शासकीय किंमत ८५ लाख २२ हजार रुपये आहे. मात्र, केवळ १२ लाख रुपयांचा रोख व्यवहार दाखवून दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १, औरंगाबाद कार्यालयात दस्त क्रमांक ३८९४ अन्वये बोगस खरेदी खत करून शासनाची व संस्थेची फसवणूक केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
कोट्यवधीचा बाजारभाव
ही जमीन करमाड शिवारात जालना रोडवर आहे. या एक एकर जमिनीची शासकीय किंमत ८५ लाख रुपये असली, तरी बाजारभावानुसार या जमिनीची किंमत ही तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा संस्थेच्या एका सभासदाने केला. याशिवाय डीएमआयसी प्रकल्पाच्या परिसरातच ही जमीन येत असल्याचेही संबंधितांना सांगितले. त्यामुळे आगामी काळात जमिनीचे मूल्य अधिक वाढणार असल्याचेही स्पष्ट होते.
चुकीचा एफआयआर दाखल
जमिनीचा व्यवहार माझ्या नावावरच झालेला आहे. आमच्या सातबारामध्ये असलेली ती जमीन आहे. त्या सातबारात त्यांचे नाव लागले. टायटल क्लिअर व्हावे, यासाठी खरेदी केली. त्यासाठी रितसर स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. पोलिसांनी शहानिशा न करताच एफआयआर दाखल केला आहे. चुना-वीटभट्टीशी माझा काही संबंध नाही. त्यांनी जमीन विकली. मी खोट्या सह्या केल्या, असे कसे होईल. विकणाऱ्यांनी केल्या असतील. माझ्या सह्या खऱ्या आहेत.
- विवेक देशपांडे, रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमुख