वाळूज उद्योगनगरीत दीड महिन्यात ४२५ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:03 AM2021-03-16T04:03:26+5:302021-03-16T04:03:26+5:30

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या ...

425 people affected in a month and a half in Waluj industrial city | वाळूज उद्योगनगरीत दीड महिन्यात ४२५ जण बाधित

वाळूज उद्योगनगरीत दीड महिन्यात ४२५ जण बाधित

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील दोन कोविड सेंटरमध्ये १९१ कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.

या परिसरातील कामगार व नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस भर पडत आहे. मुख्य बाजारपेठा, भाजी मंडई तसेच कंपन्यात अनेकजण मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत चालली आहे. बाजरपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात असून अनेकजण बिनधास्तपणे विनामास्क न घालता फिरतात. औद्योगिक क्षेत्रात शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कामगार कामासाठी ये-जा करीत असतात. मात्र सुरक्षा साधनांचा वापर करण्यास हयगय केली जात असल्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. उद्योगनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्यामुळे रविवारी (दि.१४) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, तहसीलदार किशोर देशमुख, गंगापूरचे तहसीलदार डॉ. अविनाश शिंगटे, गटविकास अधिकारी विजय परदेशी, मंडळ अधिकारी सतीश भदाणे आदींच्या पथकाने बजाजनगर व वाळूज परिसरात ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजाज विहार व कामगार कल्याण केंद्रातील कोविड सेंटरमधील रुग्णांशी चर्चा केली. या दोन्ही कोविड सेंटरमधील बेडची संख्या, औषधीचा साठा, टेस्टिंग आदींची माहिती त्यांनी घेऊन विविध सूचना केल्या. याप्रसंगी बजाजनगर-वडगाचे सरपंच सचिन गरड, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, वाळूजचे ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वाळूज येथे विना मास्क फिरणाऱ्या ४६ जणांवर दंडात्मक कारवाई करून ग्रामपंचायतीने ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपयायोजना आखूनही कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. १ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत या भागातील ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली. बजाजनगरातील कामगार कल्याण भवनमधील कोविड सेंटरमध्ये ९०, तर बजाज ऑटोच्या बजाज विहार येथील कोविड सेंटरमध्ये १०१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले. बजाजनगर परिसरात दररोज २५० ते ३०० जणांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात असून, कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस भर पडत चालल्याने उद्योगनगरीत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

-------------------------------------------

Web Title: 425 people affected in a month and a half in Waluj industrial city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.