मुंबईतील कंपनीकडून औरंगाबादच्या प्लायवूड विक्रेत्याची ४३ लाखाची फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 07:17 PM2018-10-31T19:17:04+5:302018-10-31T19:19:27+5:30
प्लायवूड खरेदी केल्यानंतर मालाचे पैसे न देता कंपनी बंद झाल्याचे सांगून मुंबईतील एका कंपनीने ४२ लाख ९७ हजार ३५७ रुपयांची फसवणूक केली.
औरंगाबाद: शहरातील प्लायवूड विक्रेत्याकडून होलसेलदरात प्लायवूड खरेदी केल्यानंतर मालाचे पैसे न देता कंपनी बंद झाल्याचे सांगून मुंबईतील एका कंपनीने ४२ लाख ९७ हजार ३५७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मुंबईतील किटप्लाय कंपनीच्या व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
सुनील अरोरा असे आरोपी व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, बीडबाय परिसरातील विवेक ओमप्रकाश धानुका हे प्लायवूडचे ठोक विक्रेता आहेत. त्यांचे खोकडपुरा आणि बायपास येथे प्लायवूडचे दुकान आहे. २०१५ मध्ये त्यांच्या दुकानात ओळखीचे गणेश देसाई आणि आरोपी सुनील अरोरा आले होते. देसाई यांनी अरोरा यांची ओळख मुंबईतील किटप्लाय कंपनीचे व्यवस्थापक अशी करून दिली होती. किटप्लाय कंपनी बाजारात प्लायवूड खरेदी करून त्यांचे ब्रॅण्डींग करून विक्र ी करायची. त्यामुळे अरोरा यांनी तक्रारदार धानुका यांच्याकडून २०१५ ते २०१७ या कालावधीत बऱ्याचदा माल खरेदी केला. खरेदी केलेल्या मालाची ते अर्धवट रक्कम देत आणि पुन्हा नवीन माल मागवित.
मोठा ग्राहक असल्याने धानुका त्यांना काही दिवसाच्या उधारीवर माल देत. सुरवातीला त्याने १ कोटी ३३ लाख ४९ हजाराचा माल खरेदी केला. त्याबदल्यात ६९ लाख ६६ हजार ७८८रुपये मार्च २०१६ मध्ये धानुकांना दिले. थकबाकी असताना २०१६-१७मध्ये आरोपींनी पुन्हा १ कोटी ५१ लाख ८१ हजार ३३ रुपयांचा माल खरेदी केला. त्याबदल्यात १ कोटी ३९ लाख ५८ हजार ४३४ रुपये मार्च २०१७ मध्ये तक्ररदारांना दिले. आरोपीकडे ६२ लाख ९७ हजार ३५१ रुपये थकबाकी होते. यानंतर आरोपीने पुन्हा २० लाख रुपये धानुकांना दिले. उरलेले ४२ लाख ९७ हजार ३५१ रुपये द्यावे, यासाठी धानुका सतत आरोपीकडे पाठपुरावा करीत होते.
आरोपीने त्यांना सांगितले की, त्यांची कंपनी तोट्यात गेल्याने बंद करण्यात आली. त्यानंतर आरोपी सुनील अरोराने तक्रारदार यांना प्रतिसाद दिला नाही. एवढेच नव्हे तर त्याने त्यांच्या मोबाईल नंबरवरून येणारे सर्व फोन कॉल अडविले. तक्रारदार यांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने त्याच्या किटप्लाय कंपनीचे नाव बदलून त्याच ठिकाणी दुसरी कंपनी सुरू केल्याचे समजले. यामुळे त्यांनी याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहे.