२३ रस्त्यांवर ४४ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:05 AM2021-06-03T04:05:22+5:302021-06-03T04:05:22+5:30
औरंगाबाद : शहरात राबविण्यात येत असलेल्या १,६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. कंपनीने रस्ता कामात बाधित ...
औरंगाबाद : शहरात राबविण्यात येत असलेल्या १,६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. कंपनीने रस्ता कामात बाधित होणाऱ्या २३ रस्त्यांवर ४४ कि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले असून, त्यापैकी ३ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले आहे. त्याकरिता स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन समितीदेखील नियुक्त केली आहे. महापालिकेतर्फे २३ रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार असल्यामुळे रस्ते तयार केल्यानंतर जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम होऊ नये याकरिता अगोदरच नवीन पाणीपुरवठा योजनेची वाहिनी टाकण्याचे नियोजन करण्याची सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला केली होती. त्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंपनीने २३ रस्त्यांवर ४४ कि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे कंपनीने २३ रस्त्यांच्या बाजूलाच जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. ३ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. त्याकरिता डीआय आणि एचडीपी या दोन प्रकारचे पाइप वापरले जात आहेत. ३४ कि.मी. एचडीपी पाइप आणण्यात आले असून, १० कि.मी. डीआय पाइप आणले आहेत. जलवाहिनी टाकण्यासाठी मात्र अगोदर पाहिजे तेवढे खोदकाम न करता पाइप टाकण्यापुरते खोदकाम केले जात आहे. त्यामुळे पाइप नागमोडी पडण्याचा धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.