'एसपीआय'चे ४४ विद्यार्थी 'एनडीए'ची 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण
By राम शिनगारे | Published: October 8, 2023 04:44 PM2023-10-08T16:44:28+5:302023-10-08T16:44:37+5:30
दोन बॅचच्या विद्यार्थ्यांचे यश : आकरा जणांची 'एनडीए'मध्ये अंतिम निवड
छत्रपती संभाजीनगर : देशातील नामांकित असलेल्या राज्य शासनाच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे (एसपीआय) तब्बल ४४ विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) संस्थेतील प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 'एसपीआय'च्या ४५ व्या तुकडीतील १९ आणि ४६ व्या तुकडीतील २५ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती प्रभारी संचालक मेजर सयद्दा फिरासत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यातील ११ विद्यार्थ्यांचा एनडीएतील प्रवेश अंतिम झाला आहे.
'यूपीएससी'तर्फे 'एनडीए' प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेत 'एसपीआय' संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाची माहिती रविवारी (दि.८) पत्रकार परिषद देण्यात आली. यावेळी संचालक मेजर सयद्दा फिरासत, कर्नल उदय पोळ, गृहपाल महेश जगताप, अधीक्षक संजय महाजन, प्रशिक्षक उत्तम आढाव, वरिष्ठ लिपिक प्रकाश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. संचालक फिरासत म्हणाल्या, एनडीएसाठी ३ सप्टेंबर रोजी यूपीएससीतर्फे परीक्षा घेतली. त्या परीक्षेचा निकाल २६ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. त्यात संस्थेचे ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील महिन्यापासून मुलाखती होतील. त्यात पात्र विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अंतीम निवड यादी जाहीर होणार आहे. त्या यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एनडीए'च्या १५२ तुकडीला आणि नेव्हीसाठीच्या विद्यार्थ्यांची ११४ व्या तुकडीला प्रवेश हाेईल. या विद्यार्थ्यांच्या 'एनडीए'तील प्रशिक्षणास २ जुलै २०२४ पासून सुरुवात होईल. एसपीआय संस्थेत १९७७ पासून आतापर्यंत ६०० पेक्षा विद्यार्थ्यांना सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी घडवीले आहे. या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करून घेतली जात असल्याचेही कर्नल एस. फिरासत यांनी सांगितले.
अंतिम निवड झालेले अकरा विद्यार्थी
'एसपीआय' संस्थेतील 'एनडीए' आर्मीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अर्थव निकम, राजवर्धन पवार (दोघे, जि. पुणे), अनघ बिश्ट (जि.ठाणे), सारंग इंगळे (जि. कोल्हापूर), हवाईदलात अर्थव जाधव (जि. नाशिक), आर्यन नाकाडे (जि.नागपूर), मानस राजपुत व वेदांत राणे (जि. जळगाव), नौदलात मल्हार देशमुख, सुजीत मोरे ( दोघे जि. पुणे) आणि वेदांत बोचे (जि. अकोला) यांचा समावेश असल्याची माहिती संचालक फिरासत यांनी दिली.