४४७ बोगस लाभार्थी पालिकेच्या रडारवर..!
By Admin | Published: May 17, 2017 12:41 AM2017-05-17T00:41:15+5:302017-05-17T00:44:05+5:30
जालना : शौचालय न बांधणाऱ्या या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जालना पालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वच्छ महाराष्ट अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ४४७ लाभार्थींनी मार्च २०१६ मध्ये ६ हजार प्रति लाभार्थी प्रमाणे अनुदान उचलले. मात्र वर्षभरानंतर शौचालय न बांधणाऱ्या या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जालना पालिकेच्या वतीने कदीम जालना पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूणच तब्बल २६ लाख ८२ हजारांचे अनुदान लाटणारे लाभार्थी पालिकेच्या रडारवर आले आहेत.
शहर हागणदारीमुक्त व्हावे म्हणून स्वच्छ महाराष्ट्र अभियानंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यात येत आहेत. यासाठी पालिकेने दीड वर्षांपूर्वी लाभार्थ्यांना दस्तवेज पाहून अनुदान वाटप केले. हागणदारीमुक्त शहर करण्यासाठी पालिकेला शहरात १३ हजार शौचालय बांधणीचे उद्दिष्ट आहे. ३१ मार्च अखेर मोठ्या प्रयत्नानंतर चार हजार नागरिकांनी शौचालय बांधून पूर्ण केले. ३० एप्रिलपर्यंत पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली. १५ मे अखेर ५ हजार २०३ शौचालयांची कामे पूर्ण झाली. त्यामुळे अद्यापही उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. याच दरम्यान पालिकेने झालेल्या शौचालय कामांची तपासणी केली असता वरील प्रकार उघडकीस आला. प्रारंभी पालिकेने उद्दिष्टपूर्ती करण्याच्या उद्देशाने ४४७ लाभार्थींच्या खात्यात सहा हजार रूपयांचे अनुदान वर्ग केले. प्रत्यक्षात तपासणी व सर्व्हेक्षणाअंती ४४७ लाभार्थी बोगस असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर लाभार्थींचे आधारकार्ड तसेच निवास पत्त्यात तफावत आहे.पालिकेने संबंधितांना वारंवार सूचना करूनही त्यांनी अनुदान परत केले नाही अथवा बांधकाम केले नाही. त्यामुळे सदर लाभार्थींवर पालिकेने कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. अभियंता रत्नाकर आडसिरे यांनी संबंधित लाभार्थींवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात. अथवा संबंधितांनी कारवाई टाळण्यासाठी पालिकेकडे संपर्क साधून शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.