मृत्युदूत बनलेले ४५ टँकर रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:51 PM2017-09-03T23:51:20+5:302017-09-03T23:51:20+5:30
नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेने खाजगी कंत्राटदारांकडून ८० पेक्षा अधिक पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेतले आहेत. यातील तब्बल ४५ टँकरचालकांकडे आरटीओ कार्यालयाची पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनीही या मृत्युदूत टँकर्सचा विमा काढून दिलेला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेने खाजगी कंत्राटदारांकडून ८० पेक्षा अधिक पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेतले आहेत. यातील तब्बल ४५ टँकरचालकांकडे आरटीओ कार्यालयाची पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनीही या मृत्युदूत टँकर्सचा विमा काढून दिलेला नाही. शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिवाशी खेळ महापालिकेने चालविला आहे. या गंभीर प्रकाराकडे मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
महापालिकेच्या टँकरने सर्वसामान्यांना चिरडल्याची घटना नवीन नाही. मुकुंदवाडीत दोन वर्षांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीला मनपा कंत्राटदाराच्या टँकरने चिरडले होते. नंदनवन कॉलनीत टँकरने एका वाहनधारकाला जोरदार धडक दिली होती. त्यात सुदैवाने कोणी मरण पावले नव्हते. मागील आठवड्यात मनपा कंत्राटदाराच्या टँकरने सिडको एन-५ येथे बीएचएमएस करणारी भावी डॉक्टर तरुणी पायल वसंत राठोड हिला चिरडले. या अपघातात ती मरण पावली. पायलला ज्या टँकरने धडक दिली तो टँकर नियमबाह्य असल्याचे वृत्त सर्वात प्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. टँकरचालकाकडे आरटीओचा टँकर म्हणून परवाना नाही. परवानाच नसेल तर फिटनेस प्रमाणपत्र मिळण्याचा प्रश्नच येत नाही.
विमा कंपन्याही टँकरचालकाला दारावर उभे करायला तयार नाहीत. एका निष्पाप तरुणीचा नियमबाह्य टँकरने मृत्यू झाल्यानंतरही मनपा प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. दोषी टँकरचालकांवर कारवाईसुद्धा करायला तयार नाही. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे आणखी ४५ टँकर अशाच पद्धतीने धावत आहेत. यातील एकाही टँकरचालकांकडे आरटीओचा परवाना नाही. नियमानुसार मनपाने भाडेतत्त्वावर टँकर लावल्यानंतर टँकरचे सर्व कागदपत्रे मनपाकडे जमा असायला हवेत. मनपाने तयार केलेला नियम मनपा स्वत:च पायदळी तुडवीत आहे. शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिवावर नियमबाह्य टँकरचालक उठलेले असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.