थर्टी फर्स्टला २४ ढाब्यांवर ४५ मद्यपींना पकडले: ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राम शिनगारे | Published: January 2, 2023 09:05 PM2023-01-02T21:05:13+5:302023-01-02T21:05:37+5:30
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने थर्टी फर्स्टच्या रात्री २४ ढाब्यांवर अवैधपणे दारू विक्रीसह मद्य पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. नववर्षाच्या निमित्ताने नेमलेल्या विविध पथकांनी तब्बल ३५ गुन्हे नोंदवित ४५ मद्यपींना पकडले; तसेच ६ लाख ८६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी ३० व ३१ डिसेंबरनिमित्त अवैधपणे दारू विक्री करणारे आणि दारू पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ढाबे, हॉटेलवर कारवाई करण्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली होती. त्यानुसार ३० व ३१ डिसेंबरच्या रात्री एकूण ३५ गुन्हे नोंदविण्यात आले. कारवाई केलेल्या हॉटेलमध्ये बाळापूर फाटा येथील हॅप्पी अवर, पडेगावचे माउली, वाळूज एमआयडीसीतील साई बन्सी, बळीराजा, शेतकरी, पिसादेवीतील शिवराज, साजापूरचे मराठा, झारी फाटाचे ओमसाई, फुलंब्रीचे अनुष्का, अंधारीचे दिशा, लाडसावंगीतील ओम श्रीसाई, बिडकीनमधील सह्याद्री, शिवाई फाटा येथील भरत, नांदगाव येथील जय महाराष्ट्र, हायवे ढाबा, सुंदरवाडीचे तुळजाई, हर्सूल येथील राजमाता, खुशी, सुरेश, जाधववाडीतील साईपालखी, श्रीसेवा, गावठी पार्टी, बीड बायपासचे ओमसाई, हॉटेल रुद्रा यांचा समावेश असल्याची माहिती अधीक्षक झगडे यांनी दिली.
मद्यपींसह मालकांना ७५ हजार दंड
उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक एल. व्ही. पाटील यांनी बीड बायपास रोडवरील हॉटेल राजदरबार येथे छापा मारला. यात मालकासह ९ मद्यपींना अवैधपणे दारू विक्री आणि पिताना पकडले. त्यांच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायालयात एक दिवसात आरोपपत्र सादर केले. त्यातील ढाबा मालक परमेश्वर दादाराव भदगे (रा. छत्रपतीनगर, देवळत्तई) यास २५ हजार, मद्यपींना प्रत्येकी २,५०० हजार रुपये असा ४८ हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावला. दुसरी कारवाई उत्पादन शुल्कच्या ‘क’ विभागाचे निरीक्षक नारायण डहाके यांच्या पथकाने हॉटेल रुद्रा याठिकाणी केली होती. मालक भाऊसाहेब मधुकर खंडागळे (रा. येसगाव नं.३, ता. खुलताबाद) हा अवैध दारू विकताना, तर चार मद्यपी दारू पिताना आढळले. या सर्वांविरोधात खुलताबाद न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर मालकास २५ हजार, मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपये असा एकूण २७ हजार रुपये दंड ठोठावला.