शहरातील ४५ ‘लेफ्ट टर्न’ मोकळे होणार; मनपाकडून काम सुरू
By मुजीब देवणीकर | Published: December 9, 2022 03:08 PM2022-12-09T15:08:41+5:302022-12-09T15:09:03+5:30
मनपा अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील लेफ्ट टर्नचे सर्वेक्षण केले.
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर लेफ्ट टर्न घेताना दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या गंभीर विषयावर ‘लोकमत’ने २२ सप्टेंबर २०२२ रोजी सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला होता. याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने शहरातील प्रमुख ४५ लेफ्ट टर्न शोधून काढले आहेत. वाहनधारकांना लेफ्ट टर्न घेताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, या दृष्टीने काम करण्यात येत असल्याची माहिती प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ७ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. याच वेळी सिग्नल सुरू असतात. ज्या वाहनधारकांना लेफ्ट टर्न घेऊन पुढे जायचे असते, त्यांना अजिबात पुढे जाता येत नाही. जोपर्यंत सिग्नल सुटणार नाही, तोपर्यंत संबंधित वाहनधारकाला उभे राहावे लागते. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांना हा त्रास सहन करावा लागत होता. लेफ्ट टर्न सुटसुटीत, अडथळाविरहित करण्यासाठी मनपा, वाहतूक पोलिस आजपर्यंत पुढाकार घेत नव्हते. ‘लोकमत’ने वाहनधारकांना कसा त्रास सहन करावा लागतोय हे छायाचित्रांसह प्रकाशित केले. याची दखल घेत प्रशासक डॉ. चौधरी यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता फड यांना कारवाईचे आदेश दिले.
अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील लेफ्ट टर्नचे सर्वेक्षण केले. ४५ लेफ्ट टर्न सर्वाधिक त्रासदायक असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी स्मार्ट सिटीकडे पडून असलेले प्लास्टिकचे बोलार्ड्स लावण्यात आले. त्यामुळे काही लेफ्ट टर्न आपोआप सुरळीत झाले. काही ठिकाणी इलेक्ट्रिक पोलचा अडथळा आहे. काही ठिकाणी वाहतूक सिग्नलचा अडथळा आहे. हे अडथळेही लवकरच दूर करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी नमूद केले.
डांबरीकरण, अतिक्रमणे हटविणे गरजेचे
मनपाने ज्या ठिकाणी लेफ्ट टर्न मोकळे केले, तेथे डांबरीकरणाची गरज आहे. वाहनधारकांसाठी रस्ता खडबडीत आहे. काही ठिकाणी मनपाने लेफ्ट टर्नच्या तोंडावरच असलेली अतिक्रमणेही काढली नाहीत.