४५ टक्के भंगार बसेसवर सुरक्षिततेची ‘वरात’ !
By Admin | Published: January 15, 2017 01:12 AM2017-01-15T01:12:37+5:302017-01-15T01:14:37+5:30
जालना सध्या एसटी महामंडळाकडून सुरक्षितता मोहिमेतंर्गत मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जात आहेत.
हरी मोकाशे जालना
सध्या एसटी महामंडळाकडून सुरक्षितता मोहिमेतंर्गत मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, जालना विभागातील जवळपास २० टक्क्यांपेक्षा जास्त बसेस ह्या कालबाह्य झाल्या आहेत, तर ४५ टक्के बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे एसटीची सुरक्षितता मोहीम ही भंगार बसेसवर सुरु असल्याचे दिसून येत आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गतच १ जानेवारीपासून प्रवाशी वाढवा अभियान सुरु आहे. तर १० जानेवारीपासून सुरक्षितता अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. ‘प्रवाशी वाढवा’अंतर्गत वाहकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे तर सुरक्षिततेतंर्गत जनजागृती, मार्गदर्शन करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या जालना विभागात एकूण चार असून २०१ बसेस आहेत. यात जालना आगारात ८०, अंबडमध्ये ६३ तर परतूर आणि जाफराबाद आगारात यापेक्षा कमी बसेसची संख्या आहे. विभागात गेल्या दोन वर्षांत नव्याने दाखल झालेल्या बसेसची संख्या २० च्या घरातही नाही. त्यामुळे जुन्या बसेसवर एसटीच्या उत्पन्नाची मदार आहे. परंतु, यातील बहुतांशी बसेस ह्या खिळखिळ्या झाल्या आहेत. काही बसेसच्या खिडकीच्या, पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे बस थांबली की प्रवाशी सहजपणे खिडकीतून ये- जा करु शकतो. त्याचबरोबर दिशादर्शक बल्ब (इंडिकेटर), आसनांचीही दैना उडाली आहे. तसेच बसला पाठीमागे रेडियम नसणे, समोरील विद्युत बल्ब अचानक बंद पडणे अशा समस्या आहेत. वास्तविक विभागात कालमर्यादा ओलांडलेल्या बसेस ह्या २० टक्क्यांपेक्षा जास्त तर खिळखिळ्या झालेल्या बसेस ४५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनीच या मोहिमेची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.