मालमत्ता कराचे ४५९ धनादेश बाऊन्स
By Admin | Published: May 14, 2016 12:02 AM2016-05-14T00:02:36+5:302016-05-14T00:10:30+5:30
औरंगाबाद : महापालिकेने ३१ मार्चपर्यंत तारेवरची कसरत करीत ८५ कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली केली. अनेक मालमत्ताधारकांनी मनपाला धनादेश दिले.
औरंगाबाद : महापालिकेने ३१ मार्चपर्यंत तारेवरची कसरत करीत ८५ कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली केली. अनेक मालमत्ताधारकांनी मनपाला धनादेश दिले. त्यातील ४५९ धनादेश बाऊन्स झाल्याचे निदर्शनास आले आहे. बाऊन्स झालेल्या धनादेशाची रक्कम जवळपासन दीड कोटी असून, मनपा प्रशासन परत मालमत्ताधारकांकडून पैसे भरून घेणार आहे. मालमत्ताधारकांनी पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मागील दीड ते दोन वर्षांपासून महापालिका आर्थिक संकटातून प्रवास करीत आहे. मालमत्ता कर वसुली, शासन अनुदान, नगररचना विभागाकडून येणाऱ्या रकमेवर दैनंदिन अर्थव्यवस्था सुरू आहे. मोठी विकासकामे करण्यासाठी तिजोरीत पैसे शिल्लक राहत नाहीत.
मनपाने डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला होता. २३० कोटींचे उद्दिष्ट असतानाही मनपाने तब्बल ८५ कोटी रुपये वसूल केले होते. अनेक व्यावसायिक मालमत्ताधारकांनी मनपाला धनादेश दिले होते. ३१ मार्चनंतर हे धनादेश मनपाने बँकेत टाकले. त्यातील ४५९ धनादेश बाऊन्स झाले.
मालमत्ताधारकांना तोंडी सूचना देऊन परत एकदा बँकेत हे धनादेश टाकण्यात येणार आहेत. संबंधित मालमत्ताधारकांनी धनादेश बाऊन्स होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. वारंवार धनादेश बाऊन्स झाल्यास विधि विभागातर्फे स्वतंत्र कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी एक स्वतंत्र विधिज्ञही नेमण्यात आला आहे.