सेवा सोसायट्यांकडे ४६ कोटी थकबाकी
By Admin | Published: June 21, 2017 11:39 PM2017-06-21T23:39:36+5:302017-06-21T23:43:35+5:30
जिंतूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंतूर शाखेद्वारे विविध सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. या ८२ सहकारी सोसायट्यांना कर्ज वाटप करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ९१ कोटी रुपयांची रक्कम दिली होती.
ज्ञानेश्वर रोकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंतूर शाखेद्वारे विविध सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. या ८२ सहकारी सोसायट्यांना कर्ज वाटप करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ९१ कोटी रुपयांची रक्कम दिली होती. त्यापैकी ४५ कोटी रुपये बुडीत झाले असून यामधील ४६ कोटी रुपये सोसायटी सभासदाकडे थकबाकी आहे. सोसायट्यामुळे बँकेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या तालुक्यातील ८२ सहकारी सोसायट्या तोट्यात आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या जिंतूर शाखेमध्ये सेवा सहकारी सोसायट्याद्वारे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे गाव पातळीवर कर्ज वितरणाची जबाबदारी सोसायट्या पार पाडतात. यामध्ये जिल्हा बँकेच्या जिंतूर शाखेच्या तालुक्यामध्ये बारा शाखा आहेत. त्यापैकी ११ शाखांमध्ये शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. या शाखांच्या कार्यरत विविध सहकारी सेवा सोसायट्या महत्त्वाची भूमिका बजावतात. या सोसायट्यांना कर्ज स्वरुपात मध्यवर्ती बँकेने ९१ कोटी रुपये दिले आहेत. आज या सहकारी सोसायट्यांकडे केवळ ४६ कोटी रुपये सभासदांकडे बाकी असल्याने मध्यवर्ती बँकेला तब्बल ४५ कोटी रुपये तोटा सहन करावा लागणार आहे.
या तोट्यात गेलेल्या सहकारी सोसायट्यांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या वैद्यनाथ समितीने ही मदत केली होती. तरीही या सहकारी सोसायट्या तोट्यात गेल्या आहेत, हे विशेष. तालुक्यातील ८२ सोसायट्यांकडे चालू थकबाकीदार १६ हजार ८४२ सभासद आहेत. तर या सोसायट्यांनी वाटप केलेली रक्कम ही ३९ कोटी ८१ लाख ६० हजार आहे. यामध्ये ५ हजार ३३ सभासदांकडे ६ कोटी २९ लाख ५६ हजार एवढी रक्कम बाकी आहे. तर जिंतूर मध्यवर्ती बँकेच्या विविध सेवा सोसायट्यांचे २२ हजार ८८५ एकूण सभासद संख्या आहे. या सोसायट्यांनी सभासदांना एकूण ४६ कोटी ३ लाख २६ हजार एवढी रक्कम कर्ज म्हणून वाटप केली आहे. या वर्षात खाते नवे-जुने करणाऱ्या १६ हजार ११६ सभासदांकडून ३६ कोटी ८५ लाख ८९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. तर या वर्षात १६२ सभासदांकडे १८ लाख २० हजार रुपयांचे कर्ज बाकी आहे. ६३४ सभासदांकडे १ कोटी ९५ लाख ८९ हजार रुपये रकक्म आहे. उर्वरित ४ हजार ८६१ सभासदांकडे ६ कोटी ३ लाख ३६ हजार रुपयांचे थकबाकी कर्ज आहे. अशाप्रकारे ९१ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेतील केवळ ४६ कोटी ३ लाख २६ हजार एवढीच रक्कम सध्या सेवा सहकारी सोसायट्यांकडे कर्ज आहे. तर बाकी ४५ कोटी रुपयांचा चुना सभासदांनी मध्यवर्ती बँकेला लावला आहे.