सोयाबीन न उगवल्याच्या मराठवाड्यात ४६ हजार तक्रारी, अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 05:48 AM2020-07-07T05:48:29+5:302020-07-07T05:49:23+5:30
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ ३ जुलैपर्यंत सोयाबीनची ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ परंतु, सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़
औरंगाबाद : अनेक वर्षांनंतर मराठवाड्यात जूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्यानंतर नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सीयाबीनचा पेरा केला. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही. आतापर्यंत मराठवाड्यात तब्बल ४६ हजार ८८२ तक्रारी आल्या असताना केवळ १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ ३ जुलैपर्यंत सोयाबीनची ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ परंतु, सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ बोगस बियाणेप्रकरणी ईगल सीड्स कंपनीविरोधात वजिराबाद ठाण्यात तर धर्माबाद पोलीस ठाण्यात सारस अॅग्रो कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
लातूर जिल्ह्यात सोयाबीन न उगवल्याच्या तब्बल सहा हजारांवर तक्रारी असल्या तरी केवळ एकच गुन्हा आतापर्यंत दाखल झाला आहे. बीड जिल्ह्यात सोयाबीन न उगवल्याच्या पाच हजारांवर तक्रारी आल्या आहेत.