चोरट्यांनी सहा महिन्यांत पळविल्या ४६३ दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:27 AM2017-08-14T00:27:14+5:302017-08-14T00:27:14+5:30
जानेवारीपासून आतापर्यंत चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतून ४६२ दुचाकी पळविल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तीन वर्षांपासून सुसाट वाहन चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारीपासून आतापर्यंत चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतून ४६२ दुचाकी पळविल्या. विशेष म्हणजे २०१५ आणि २०१६ यावर्षीही सहा महिन्यांत वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण समान आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांच्या दुचाकी चोरटे पळवीत आहेत. दुचाकी चोरट्यांचा भरदिवसा सुरू असलेला हा धुमाकूळ रोखण्यात पोलीस यंत्रणेला म्हणावे तसे यश येत नाही. परिणामी घरासमोर असो अथवा कार्यालय, रुग्णालयाच्या पार्किं गमध्ये लॉक करून ठेवलेल्या दुचाकी चोरटे बिनधास्तपणे पळवितात. यावर उपाय म्हणून काही वाहनमालक दुचाकींना साखळदंड बांधतात. शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा फारसा परिणाम चोरट्यांवर झालेला दिसत नाही. २०१५ मध्ये चोरट्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ९०० दुचाकी पळविल्या होत्या, तर गतवर्षी २०१६ साली दुचाकी चोरीचा आकडा ९१८ पर्यंत वाढला होता. या दोन्ही वर्षी अनुक्रमे २०९ आणि २६८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. यावर्षी जानेवारीपासून ते जुलैअखेरपर्यंत चोरट्यांनी ४६२ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या, तर आतापर्यंत केवळ ५८ गुन्हेच उडघकीस आणण्यात पोलिसांना यश आले. वाहनचोरी रोखण्यासाठी गस्त प्रभावी अस्त्र आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलिसांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावून गस्तीवरील वाहनांची गती वाढविली. आयुक्तांनी शहरातील प्रत्येक कोपरा आणि प्रमुख रस्ते सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीखाली आणण्याचे ठरविले.