छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध वसाहतींमध्ये २४१ कंपन्या करणार ४,६६१ कोटींंची गुंतवणूक
By बापू सोळुंके | Published: March 14, 2024 06:13 PM2024-03-14T18:13:33+5:302024-03-14T18:13:37+5:30
डीआयसीच्या गुंतवणूक परिषदेला प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत तब्बल २४१ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांनुसार आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांनी ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी हे सामंजस्य करार करण्यात आले.
ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित वसाहत, वाळूज, पैठण, चिकलठाणा आणि ऑरिक सिटींतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये औद्योगिक विश्वाला भरभराटीची संधी आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी येथील औद्योगिक वसाहतींमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उद्योगांना वीजबिल, जीएसटीमध्ये अनुदान तसेच भूखंडांची रजिस्ट्री करण्यासाठीही स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत दिली जाते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दि. ९ मार्च रोजी चिकलठाणा येथील मासिआच्या सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी अध्यक्षस्थानी होते.
या परिषदेमध्ये २४१ उद्योग घटकांसोबत ४ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे येथील १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग विभागाच्या वतीने सांगण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, रोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील उपस्थित होते. परिषदेच्या प्रारंभिक उद्योग सहसंचालक, यशवंते यांनी शासनाचे नवीन आयटी धोरण आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांची माहिती दिली. गिरासे यांनी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीचे योगदान अधोरेखित केले.
१५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार
विविध औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कंपन्यांनी विस्तार करीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तसेच, काही लहान कंपन्यांनी छोटे भूखंड खरेदी करून तेथे उद्योग थाटण्याचा निर्णय घेतला. अशा सुमारे २४१ कंपन्या जिल्ह्यातील विविध वसाहतींमधील कंपन्यांत तब्बल ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. यातून १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.