मागितले ४६७ कोटी ; मिळाले ९४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:01+5:302020-12-11T04:21:01+5:30
औरंगाबाद : स्टेट डिझास्टर रिस्क्यू फंड (एसडीआरएफ / राज्य आपत्कालीन मदतनिधी) अंतर्गत मराठवाड्याला कोरोना नियंत्रणासाठी ४६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त ...
औरंगाबाद : स्टेट डिझास्टर रिस्क्यू फंड (एसडीआरएफ / राज्य आपत्कालीन मदतनिधी) अंतर्गत मराठवाड्याला कोरोना नियंत्रणासाठी ४६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी शासनाकडे सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. त्यापैकी ९४ कोटी ६२ लाख ८६ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.
औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांसाठी ९४ कोटी ६२ लाख ८६ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. तर परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यांना निधीची प्रतीक्षा आहे. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्याला ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्याने ९७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविलेला होता. त्यापैकी ३७ कोटी एक लाख २१ हजारांचा तर उस्मानाबाद जिल्ह्याने १२ कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, ६ कोटी २८ लाख ४२ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. तर हिंगोलीला ३३ कोटींपैकी १२ कोटी ५६ लाख ९४ हजार तर नांदेडला ४४ कोटींपैकी ३० कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तर जालना जिल्ह्याला १९ कोटींपैकी ७ कोटी ९९ लाख ९४ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. महापालिका आणि नगरपालिकांच्या अनुदान मागणीचा देखील यामध्ये समावेश आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कोरोनामुक्त होण्यासाठी अजून किती काळ लागणार, याबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही.
एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत दिले ५२ कोटी
कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून आजवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एसडीआरएफमधून ५२ कोटी रुपयांचा निधी आला आहे. तो निधी आजवर तीन टप्प्यांत वाटप करण्यात आला. सर्वाधिक १६ कोटी ५० लाख रुपये औरंगाबाद जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. जालना ५ कोटी, बीड ५ कोटी १० लाख, परभणी ५ कोटी २५ लाख, उस्मानाबाद ३ कोटी, लातूर ७ कोटी ५० लाख, हिंगोली ५ कोटी १० लाख, नांदेड ५ कोटी १५ लाख असे ५२ कोटी एसडीआरएफमधून विभागाला मिळालेले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरतील निधी वाटपाचा यात समावेश नाही.