सामान्य प्रसूतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशू; जोखमीची प्रसूती झाली यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 08:14 PM2018-11-14T20:14:05+5:302018-11-14T20:14:37+5:30
गर्भावस्थेत शिशूचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते.
औरंगाबाद : गर्भावस्थेत शिशूचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशूचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशू या दोघांच्या जिवाला धोका संभवतो; परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ किलो वजनाच्या शिशूची सामान्य प्रसूती यशस्वी केली. प्रसूतीनंतर माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंदोन-भिंदोन तांडा येथील रहिवासी दीपाली संजय राठोड या डॉ. मगर यांच्याकडे गरोदरपणात उपचारासाठी आल्या होत्या. तेव्हा गर्भातील शिशूचे वजन ४ किलोपेक्षा अधिक आहे, याचा अंदाज सोनोग्राफीत आला. गरोदरपणात आईच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास बाळाचे वजन वाढत जाते. अशावेळी प्रसूतीदरम्यान अडचणी येतात. बाळाचे खांदे आत अडकल्यास श्वास गुदमरून मृत्यूचाही धोका असतो. अशा बाळालाही पहिले ४८ तास निरीक्षणात ठेवणे गरजेचे असते. बाळाच्या रक्तातील साखर तपासणेही गरजेचे असते.
डॉ. मगर म्हणाले, अशा अधिक वजनाच्या बाळाच्या जन्माचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी असते. या आधीचे बाळांतपण नैसर्गिक असल्याने मातेला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रोत्साहन दिले. तिचे मनोबल वाढविले. माता आणि तिच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर नैसर्गिक प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. असे बाळंतपण हे आई आणि बाळासाठी अतिजोखमीचे असते; परंतु ही प्रसूती यशस्वी झाली आणि दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
साधारणपणे ३ किलोपर्यंत वजन
सर्वसाधारणपणे अडीच ते तीन किलोपर्यंत शिशूचे वजन असते; परंतु मातेला मधुमेह असेल, तर शिशूचे वजन अधिक होत असते. अशावेळी सामान्य प्रसूती होणे अवघड असते, असे घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.