४७५ एसटीने सोडली अर्ध्या रस्त्यात साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:02 AM2021-02-10T04:02:01+5:302021-02-10T04:02:01+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : एसटी महामंडळाचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. लालपरी, गोरगरिबांची जीवनवाहिनी अशीही ‘एसटी’ची ...

475 ST left halfway along | ४७५ एसटीने सोडली अर्ध्या रस्त्यात साथ

४७५ एसटीने सोडली अर्ध्या रस्त्यात साथ

googlenewsNext

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : एसटी महामंडळाचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. लालपरी, गोरगरिबांची जीवनवाहिनी अशीही ‘एसटी’ची ओळख आहे. दररोज हजारो प्रवासी ‘एसटी’तून प्रवास करतात. परंतु अनेकदा बसच्या नादुरुस्तीमुळे प्रवाशांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होतो. गेल्या दोन वर्षांत तब्बल ४७५ एसटींनी नादुरुस्तीमुळे अर्ध्या रस्त्यातच साथ सोडली. खड्डेमय रस्ते, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, भंगार बसेसचा फटका प्रवाशांना बसत आहे.

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात ५६८ बसगाड्यांचा ताफा आहे. कोरोनामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. परिणामी गतवर्षी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण काहीसे कमी राहिले. दीडशे बस २०२० मध्ये नादुरुस्त झाल्या. तर २०१९ मध्ये हेच प्रमाण ३२५ इतके होते. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, बसेस लवकर खिळखिळ्या होऊन बसस्थानकातून रवाना झाल्यानंतर भर रस्त्यावर एसटी नादुरुस्त होण्याचा प्रकार होतो. एक तर बस दुरुस्त होण्याची वाट पहावी लागते अन्यथा अन्य बस येण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यातून प्रवासाचे नियोजनच विस्कळीत होते. नादुरूस्त बसच्या दुरुस्तीसाठी ब्रेक डाऊन वाहनही एसटीच्या ताफ्यात आले आहे. या वाहनामुळे कमीत कमी वेळेत बसची दुरुस्ती करणे शक्य होत आहे.

---

कोरोना काळात बस सेवा काही काळ बंद होती. त्यामुळे गतवर्षी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी राहिले. बस नादुरुस्त होण्यात जवळपास ५० टक्के घट झाली. २०१९ मध्ये ३२५ बसेस नादुरुस्त झाल्या होत्या. जुन्या बस गाड्यांचे प्रमाण विभागात अत्यल्प आहे.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

----

रस्त्यात एस.टी. बंद पडण्याची कारणे

बसस्थानकातून रवाना झाल्यानंतर रस्त्यात एसटी बंद पडण्याची अनेक कारणे आहेत. यात प्रमुख कारण टायर पंक्चर होणे आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या त्रासाला अधिक तोंड द्यावे लागते. त्याबरोबरच इंजिन जाम होणे, रेडिएटरच्या पंख्याचा बेल्ट तुटणे, सस्पेशनमधील बिघाड यासह इतर कारणांमुळे अचानक एसटी ऐन रस्त्यात बंद पडते.

----

दहा वर्षांवरील ११० बसेस

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात जवळपास ११० बसगाड्या या १० वर्षांवरील आहे. आरटीओ कार्यालयाच्या नियमानुसार वाहन १५ वर्षे वापरता येते. त्यानंतर वाहनाची पुनर्रनोंदणीची प्रक्रिया करावी लागते. एसटी महामंडळ मात्र एखाद्या बसचा १२ वर्षे अथवा १२ लाख कि.मी. अंतर होईपर्यंत वापर करते. त्यानंतर ती बस स्क्रॅपमध्ये काढली जाते.

---

दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचा हिशोब नाही

प्रत्येक आगार पातळीवर देखभाल-दुरुस्तीसाठी ४० ते ४५ कर्मचारी आहेत. एखादी बस ज्या ठिकाणी नादुरुस्त होते, तेथील जवळच्या आगाराच्या माध्यमातून बसेसची देखभाल-दुरुस्ती केली जाते. महामंडळाचेच कर्मचारी हे काम करतात. त्यासाठी आवश्यक साहित्यही उपलब्ध असते. परंतु या देखभाल-दुरुस्तीवर किती खर्च होतो, याचा हिशोब होत नसल्याची परिस्थिती आहे.

--

जिल्ह्यातील एसटी बसेस-५६८

आगारनिहाय बसची संख्या

मध्यवर्ती बसस्थानक - १४७

सिडको बसस्थानक - ९३

पैठण - ६६

सिल्लोड - ६१

वैजापूर - ५५

कन्नड - ५५

गंगापूर - ५२

सोयगाव - ३९

Web Title: 475 ST left halfway along

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.