‘नीट’ परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ४८ केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:05 PM2020-09-11T16:05:53+5:302020-09-11T16:07:40+5:30
१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा देशभर आयोजित करण्याचे नियोजन नॅशनल टेस्टिंंग एजन्सीद्वारे करण्यात आले आहे.
औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट ) १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेला औरंगाबाद शहरातील ४८ परीक्षा केंद्रांवर तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती समन्वयक रविंदर राणा यांनी दिली.
१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा देशभर आयोजित करण्याचे नियोजन नॅशनल टेस्टिंंग एजन्सीद्वारे करण्यात आले आहे. यात ७२० मार्कांची परीक्षा असून, १८० प्रश्न असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले आहेत. मे, जून, जुलै महिन्यांत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात येत होती. १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यालाही विविध राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविलेला असतानाही परीक्षा घेण्यावर केंद्र शासन ठाम राहिले. त्यामुळे ही परीक्षा होत आहे.
औरंगाबाद शहरातील ४८ परीक्षा केंद्रांवर १२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंंगच्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी गर्दी करू नये, यासाठी सकाळी ११ वाजेपासून विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या वेळेनुसार प्रवेश करावा लागणार आहे. ही प्रवेशाची प्रक्रिया दीड वाजेपर्यंत चालणार आहे. याशिवाय एका वर्गात केवळ १२ विद्यार्थी बसण्याची परवानगी आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क आदी सुरक्षा साधनेही पुरविण्यात येतील, तसेच वर्गात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासण्यात येईल. यात कोणाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आयसोलेशन असलेल्या हॉलमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही समन्वयक रविंदर राणा यांनी सांगितले.
गोंधळ होऊ नये याकडे लक्ष
नीटच्या परीक्षेवेळी आतमध्ये विद्यार्थी प्रवेश करताना आणि त्यानंतर बाहेर जाताना गोंधळ होऊ नये, सोशल डिस्टन्सिंंगच्या नियमांचे पालन केले जावे, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.