४८ प्रवासी बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:00 AM2017-09-23T01:00:33+5:302017-09-23T01:00:33+5:30
शिर्डीकडून औरंगाबादला येणाºया एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे ही भरधाव बस बजाज गेटसमोरील एका झाडावर धडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बसचालकाच्या सतर्कतेमुळे या अपघातात बसमधील ४८ प्रवासी बालंबाल बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : शिर्डीकडून औरंगाबादला येणाºया एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे ही भरधाव बस बजाज गेटसमोरील एका झाडावर धडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बसचालकाच्या सतर्कतेमुळे या अपघातात बसमधील ४८ प्रवासी बालंबाल बचावले आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, एसटी महामंडळाच्या शिर्डी आगाराची बस क्रमांक एम.एच.-१४, बी.टी.-३८२४ ही आज शुक्रवारी सकाळी प्रवासी भरून शिर्डीकडून औरंगाबादला येण्यासाठी निघाली होती. अहमदनगर-औरंगाबाद या महामार्गावरून येत असताना अचानक या बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे घाबरलेल्या चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेत असताना बजाज गेटसमोरील एका झाडावर जाऊन धडकली.
या अपघातामुळे बसमधील संजय कुंटे (रा. फुलंब्री) यांच्यासह चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचालक गजानन वानखेडे याने प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याच्या कडेला घेतल्यामुळे समोरील वाहनावर बस न धडकता ती रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली.
हा अपघात घडताच बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केल्यामुळे बजाजगेट-वाल्मीरोडवरील हॉटेल व्यावसायिक व रस्त्याने ये-जा करणाºया वाहनधारकांनी अपघातस्थळ गाठून बसमधील प्रवाशांना दिलासा देत त्यांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ. साळवे, पोकॉ. राजकुमार सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना मदत केली.