सिल्लोड तालुक्यातील ५ मंडळात अतिवृष्टी; केळगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 05:34 PM2018-08-17T17:34:28+5:302018-08-17T17:37:15+5:30
तालुक्यातील अंभई , सिल्लोड, अजिंठा ,गोळेगाव, निल्लोड या पाच मंडळात अतिवृष्टी झाली.
सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील अंभई , सिल्लोड, अजिंठा ,गोळेगाव, निल्लोड या पाच मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच जोरदार पावसामुळे केळगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे.
संततधार पावसाने पाच मंडळात अतिवृष्टी झाली असली तरी याने जास्त हानी झाली नाही. उलट खरीप पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले आहे. पावसाचे पाणी शेतातून बाहेर पडले नाही ते शेतातच मुरले. यामुळे शेतातील विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मका व कापूस आडवे झाल्याने तुरळक नुकसान झाले आहे.
सिल्लोड तालुक्यातील आठ महसूल मंडळात पडलेला पाऊस असा:-
अंभई 120 मिलिमीटर , सिल्लोड 100 ,अजिंठा 70 ,गोळेगाव 80, निल्लोड 73 मिलिमीटर, भराडी 61,आमठाणा 48,बोरगाव बाजार 68 मिलिमीटर पाऊस झाला. एकूण पाऊस 610 मिलिमीटर झाला.तालुक्याचा सरासरी पाऊस 76.25 मिलिमीटर झाला आहे. तर आता पर्यंत सिल्लोड तालुक्यात एकूण 249.51 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
या पावसामुळे केळगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहे. प्रकल्पाचा एकूण साठा ३९ टक्क्यावरून ६० टक्क्यांवर गेला आहे. तसेच केळगाव नदीला पूर आल्याने दुपार पासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पाणी प्रश्न मिटेल...
सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी मुळे कुठेच जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. भिज पावसामुळे नक्कीच विहिरींची पाणी पातळी वाढेल.यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल तालुक्यातील टँकर बंद होतील. या पावसाने खूप दिलासा दिला आहे.
- संतोष गोरड, तहसीलदार सिल्लोड.