परळी तालुक्यातील धारावती तांड्यावरील ५ हातभट्ट्यां उद्धवस्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 07:58 PM2020-04-27T19:58:22+5:302020-04-27T19:58:22+5:30
एका महिलेसह चौघांवर गुन्हा
बीड : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू आहे. तसेच दारु व तंबाखूजन्य पदार्थ यावरही बंदी घातलेली आहे. मात्र, हातभट्टी दारु विक्रीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाभरात हातभट्ट्यांवर धाडसत्र सुरु आहे. परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत ५ हातभट्ट्या उध्दवस्त केल्या. ही कारवाई २६ एप्रिल रोजी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेला खब-यामार्फत धारावती तांडा येथे मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टी दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाचे सपोनि आनंद कांगुणे, परळी ग्रामीण ठाणे प्रमुख पोनि शिवलाल पुर्भे व इतर कर्मचाºयांनी तेथे छापा टाकला. यावेळी परिसरातील शासकीय गोदामापाठीमागे त्रिंबक विठ्ठल राठोड, अंकुश धनू राठोड हे त्यांच्या शेतात हातभट्टी दारु तयार करण्यासाठी गूळमिश्रित रसायन बनवत होते. पोलिसांना पाहताच दोघांनी तेथून पळ काढला. यावेळी ४०० लिटर गूळमिश्रित रसायन, ५ लिटर गावठी हातभट्टी दारु (किंमत ८ हजार २५० रुपये) नष्ट करण्यात आली.
तेथूनच काही अंतरावर एका शेतात भाऊराव गोविंद पवार, प्रवीण बाबूराव पवार, गीताबाई देविदास राठोड हे हातभट्टी दारु तयार करीत होते. पोलिसांनी पाहताच त्यांनी देखील तेथून पळ काढला. तेथे १२ हजार रुपयांची गावठी दारु, ६०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. तसेच हाभट्ट्या नष्ट करण्यात आल्या. ही कारवाई परळी ग्रामीणचे पोनि शिवलाल पुर्भे, सपोनि आनंद कांगुणे, पोना सखाराम पवार, झुंबर गर्जे, संतोष हंगे, गहिनीनाथ गर्जे, गोविंद काळे, परळी ग्रामीणचे पोह हंगे, गीते, चाटे यांनी केली.