शेकटा येथे एकाच रात्री ५ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:48 PM2019-06-12T22:48:47+5:302019-06-12T22:48:58+5:30
शेकटा (ता. औरंगाबाद) येथे मंगळवारी मध्यरात्री सहा जणांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला.
करमाड : शेकटा (ता. औरंगाबाद) येथे मंगळवारी मध्यरात्री सहा जणांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. दोन दिवस थांबा, नंतर तक्रार घेऊ, असे पोलिसांनी सांगितल्याने ग्रामस्थांनी अखेर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
शेकटा येथील ग्रामस्थ बुधवारी पहाटे साखरझोपेत असताना सहा जणांच्या सशस्त्र टोळीने शेकटा गावात प्रवेश केला. चोरट्यांच्या हातात काठ्या व कोयत्यासारखे शस्त्र होते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एका घरात प्रवेश करून ६ हजार रुपये चोरून नेले.
त्यानंतर जालना मार्गावरील न्यू मातोश्री हॉटेलचे मालक नामदेव वाघ यांच्या हॉटेलमागील घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांचे कपाट उचकटून कपाटातील ३८ हजार रुपये लुटून चोरटे पसार झाले.
दरम्यान, चोरट्यांनी प्रदीप सुभाष वाघ यांच्या घरातील देवघरातून ७ हजार रुपये किमतीची लक्ष्मीची मूर्ती चोरून नेली. यावेळी वाघ यांच्या डस्टरचा दरवाजा तोडून चोरटे त्यांची गाडी चोरून नेणार होते; परंतु प्रदीप वाघ यांना जाग आल्याने त्यांनी समयसुचकता दाखवत आपली परवानाधारक रिव्हॉल्व्हर चोरट्यावर रोखली. यावेळी चोरट्यांनी घटनास्थळाहून पळ काढला.
त्यानंतर सकाळी ४ वाजेच्या सुमारास चोरट्यानी सुभाष वाघ यांच्या घराचे चॅनल गेट तोडून घरात प्रवेश केला; परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जालना मार्गावरील दादासाहेब विश्वनाथ जाधव यांच्या साई हॉटेलकडे वळविला; परंतु याठिकाणी चोरटे सीसीटीव्ही कॅ मेऱ्यात कैद झाले.
शेकटा येथील प्रदीप वाघ म्हणाले की, बुधवारी सकाळी दीड ते साडेचार वाजेपर्यंत शेकटा गावावर चोरट्यांचे राज्य होते. एकाच रात्री ५ घरफोड्या झाल्याने गावात दहशत पसरली आहे. बुधवारी आम्ही करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता उद्या तक्रार घेऊ म्हणून सांगण्यात आले.
त्यानुसार आम्ही उशिरा औरंंगाबाद येथे येऊन पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चोरीची तक्रार दिली. जेव्हा संबंधित लोक पुढे येऊन तक्रार देतील त्यावेळी नेमके चोरीला काय गेले हे समोर येईल.