अवैध ढाब्यांवरील ८१ आरोपींना ५ लाख ५० हजारांचा दंड
By राम शिनगारे | Published: September 10, 2023 09:23 PM2023-09-10T21:23:10+5:302023-09-10T21:23:20+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १७ गुन्ह्यातील कारवाई
छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध १७ ढाब्यांवर केलेल्या कारवाईत ८१ आरोपींना लोक अदालतमध्ये ५ लाख ५१ हजार ५०० रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला. हा दंड आरोपींनी भरला असल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
जिल्हा न्यायालयामध्ये ९ सप्टेंबर रोजी लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ गुन्ह्यातील आरोपींना लोकअदालतमध्ये हजर केले होते. त्यात ८१ आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर न्यायालयाने १७ ढाबा मालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि ६४ मद्यप्राशन करणाऱ्या नागरिकांनी प्रत्येकी दाेन हजार रूपये आणि तीन आरोपींना ५०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यात ढाब्यांवर अवैधपणे दारू विक्री करणे आणि दारू पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्यांच्या विरोधात धडक माेहिमच उघडली होती.
त्यातच १७ ढाब्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. १७ ढाबा मालकांसह ६४ दारु पिणारे असे एकुण ८१ आरोपींच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. संबंधित खटले लोक अदालतमध्ये निकाली काढण्यासाठी सादर केले होते. आरोप असलेल्या व्यक्तींनी गुन्ह्यांची कबुली देत न्यायालयाने ठोठावलेला ५ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड भरला असल्याचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले. लोकअदालतमध्ये गुन्हे निकाली काढण्यासाठी निरीक्षक आनंद चौधरी, नारायण डहाके, राहुल गुरव, दुय्यम निरीक्षक गणेश पवार, गणेश इंगळे, बालाजी वाघमोडे, रमेश विठोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, प्रविण पुरी, बालु पुरी, अशोक सपकाळ आदींनी प्रयत्न केले. यासाठी अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक शरद फटांगडे यांनी मार्गदर्शन केले.
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दंड
एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींना शिक्षा ठोठावून दंड वसुल करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वीही अनेक खटल्यांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांमध्ये निकाल लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, एकाच वेळी साडेपाच लाख रुपये दंड ८१ आरोपींकडून वसुल करण्यात आला आहे.