समृद्धी महामार्गावर लावणार ५ लाख रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:16 PM2020-10-02T12:16:38+5:302020-10-02T12:17:02+5:30
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पाच लाख झाडे लावण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी तब्बल १०७ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तसेच लावलेली झाडे पाच वर्षांपर्यंत जगवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार संस्थेची असणार आहे.
जिल्ह्यातून ११२ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग जात आहे. हा रस्ता तयार करताना वाटेत येणारी हजारो झाडेझुडपे तोडण्यात आलीहोती. त्यामुळे महामार्गाचा आजूबाजूचा परिसर बकाल झाला होता. मुळातच समृद्धी महामार्ग हा ग्रीन फिल्ड म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने या महामर्गाच्या दुतर्फा लहान, मोठी, मध्यम स्वरूपाची तब्बल ५ लाखांहून अधिक रोपे लावण्याचा निर्धार केला आहे. तसेच दुभाजक व रस्त्याच्या कडेला लॉन, रस्त्याचे सौंदर्य वाढविणारी फुलझाडीही लावण्यात येणार आहेत.
साग, चिंच, वड, कडुनिंब, करंजी, आपटा, बेल, बिबा, उंबर, शिसव, धावडा, बांबू, संक्यासूर, आवळा, बाभूळ, पिंपळ, बदाम, काजू, आंबा ही झाडे दुतर्फा लावण्यात येतील.