विद्यापीठ ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ मधून प्राध्यापकांना संशोधनासाठी देणार ५ लाखांचे अनुदान
By योगेश पायघन | Published: October 23, 2022 07:21 AM2022-10-23T07:21:20+5:302022-10-23T07:25:01+5:30
संशोधन, पेटंट, रिसर्च पेपरकडे कुलगुरूंनी केले लक्ष केंद्रित,
- योगेश पायघन
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग आणि उस्मानाबाद येथील उपपरिसरातील कार्यरत प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रोत्साहन, अर्थसहाय्य करण्यासाठी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या संकल्पनेतून ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ची स्थापना करण्यात आली आहे. संशोधन वाढवून ते समाजाभिमूख करण्यासाठी विविध समित्यांची स्थापनाही केली आहे. प्राध्यापकांकडून संशोधन प्रकल्प मागवण्यात आले असून, काही संशोधन प्रकल्प विद्यापीठाकडूनही प्राध्यापकांना दिल्या जाणार आहे. त्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदानही विद्यापीठ फंडातून देण्यात येणार आहे.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलमध्ये ‘रिसर्च अॅडव्हायझरी काउंन्सिल’ची स्थापना करण्यात आली. ही समिती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असून, यात माजी कुलगुरू डाॅ. विजय पांढरीपांडे, पद्मभूषण जी. डी. यादव, डाॅ. व्ही. किसन, डाॅ. पी. आर. पुराणिक, अनिल भालेराव, राम सगरे यांच्यासह प्रकुलगुरू, चारही अधिष्ठातांचा समावेश असेल. या १२ सदस्यांच्या समितीचे सदस्य सचिव आणि ‘सेल’चे संचालक म्हणून अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या ‘सेल’च्या माध्यमातून प्राध्यापकांना संशोधनासाठी मदत, प्रोत्साहन; तसेच संशोधन, पेटंट, पब्लिकेशन वाढविण्याची जबाबदारी कुलगुरूंनी सोपवली आहे. या प्रकल्पांच्या माॅनिटरींगसाठी वेगवेगळ्या पाच समित्यांची स्थापना केली असून, त्यात विद्यापीठातील; तसेच बाहेरीत तज्ज्ञांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील जुन्या कॅन्टींनची जागा या ‘सेल’साठी निश्चित करण्यात आली आहे.
अनुदान विद्यापीठ फंडातून देऊ
दर्जेदार संशोधन विद्यापीठात होताहेत. त्याला प्रोत्साहन मिळून हे संशोधन आणखी समाजाभिमूख करण्यासाठी ‘रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेल’ची स्थापना केली. विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी दर्जेदार शोधनिबंध, संशोधन पेटंट नोंदणी आदींकरिता हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठाने काही संशोधन प्रकल्प प्राध्यापकांना द्यायचे ठरवले असून, त्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान विद्यापीठ फंडातून देऊ. त्यासाठी एक कोटींचे बजेट आहे. १० नोव्हेंबरपर्यंत प्रकल्प मागवण्यात आले आहेत. त्यानंतर स्क्रिनिंग, प्रेझेंटेशन करून दर्जेदार संशोधन प्रकल्पांना अनुदान देऊ.
- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचा शोध
विज्ञान शाखेतील संशोधन प्रकल्पांसाठी ३ लाखांपर्यंत, तर इतर शाखांसाठी आवश्यकतेनुसार २ लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. महिनाभरापूर्वी स्थापन झालेल्या या ‘सेल’चे नियम, अटी व मार्गदर्शक सूचनांची निर्मिती करून समित्यांची स्थापना केेली आहे. आता या ‘सेल’च्या कामाला मूर्त स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे. मल्टिडिसिप्लिनरी संशोधनाला प्रोत्साहन आणि नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना समोर आणण्यासाठीही आता विद्यापीठाकडून प्रयत्न होणार आहे.