वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत
By साहेबराव हिवराळे | Published: January 11, 2024 07:11 PM2024-01-11T19:11:08+5:302024-01-11T19:14:32+5:30
मानसिकता बदलण्याची आवश्यकता; बांधकाम व्यावसायिक तसेच उद्यान व झाडासाठी पाणी वापरण्यास योग्य
छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात आता सकारात्मक खूप कामे होत आहेत त्याचा एक भाग म्हणून आता औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून तब्बल पाच एमएलडी पाणी रोज शुद्ध करण्यात येत आहे. हे शुद्ध केलेले पाणी उद्यान, दुभाजकावरील झाडे किंवा औद्योगिक क्षेत्रातील वनीकरणासाठी योग्य असूनही खामनदीत हे पाणी सोडून द्यावे लागत आहे. सीईटीपी प्लांट उभारून व त्याचा योग्य वापर करूनही केवळ इच्छाशक्ती नसल्याने हे पाणी न वापरता नदीत सोडून द्यावे लागत आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती, कडक उन्हाळ्याचा काळ यावेळी औद्योगिक क्षेत्रातील बागबगिचा हिरवागार ठेवण्यासाठी हे पाणी अमृतच ठरणार आहे; परंतु, त्याविषयी कुणीही विचार करीत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील सांडपाणी वाहून गेल्याने परिसरातील जमिनीची पोत खराब झालेली असून, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासावरून लक्षात आले होते. त्यामुळे एमआयडीसीने वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारला. पूर्ण एमआयडीसीतील कारखान्याचे टाकाऊ पाणी यामुळे शुद्ध होऊ लागले आहे. याची उभारणी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी झाली होती हे विशेष. असे असले तरीही आज जमिनीचा पोत सुधारलेला नाही. पूर्वी जे सांडपाणी मोकळ्या प्लॉटवर किंवा नाल्यात, नदीत सोडण्याचे प्रकार होत होते. यामुळे परिसरातील शेतकरी, मेंढपाळ तसेच गोपालकांना या सांडपाण्याचा मोठा फटका बसलेला होता. अनेक शेतकरी तसेच गोपालकांनी सांडपाण्याची ओरड केली होती त्याची दखल घेत सीईटीपी प्लांट उभारण्यात आला.
सांडपाणी वाहून आणले प्लांटमध्ये...
रसायनयुक्त पाणी, ऑइल, इतर वापराचे पाणी या प्लांटमध्ये भूमिगत वाहिनी टाकून वाहून आणले आहे. दररोज पाच एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नाइलाजास्तव नदीत सोडले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी विकणे किंवा नदीत टाकण्यापेक्षा ते बांधकाम व्यावसायिक तसेच एमआयडीसीने लावलेल्या झाडांना टाकल्यास परिसरात हिरवळ कायम राहू शकेल, असाही निसर्गमित्रांचा आग्रह आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग करावी...
जमिनीतील पाणी दूषित झाले असून, ते योग्य नाही असे म्हटले तरी चालेल; परंतु, आपण जमिनीत रेन वाॅटर हार्वेस्टिंगनेही पावसाचे पाणी जमिनीत जिरवू शकतो. जमिनीची पोत सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळही यावर काम करीत आहे. उद्योजकांनी मार्ग अवलंबला पाहिजे.
- अनिल पाटील, पाणी चळवळ
बांधकाम व्यवसाय व बागांसाठी पाणी नेता येईल..
औद्योगिक क्षेत्रातील घाण पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते वापरायोग्य होते, झाड तसेच बांधकामासाठी नेता येईल; परंतु, तसेच कुणाची मागणी आलेली नाही.
- गीतेश साबणे, प्लांट प्रमुख