लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; सकल मराठा समाजाने केला निश्चय
By बापू सोळुंके | Published: March 2, 2024 06:53 PM2024-03-02T18:53:39+5:302024-03-02T18:54:07+5:30
जळगाव रोडवरील मराठा मंदीर मंगलकार्यालयात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.
छत्रपती संभाजीनगर: शासनाने दिलेले एसईबीसी १० टक्के आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात एसआयटी लावून त्यांना अडकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्यावतीने सर्व राजकीय पक्षाविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा आणि सुमारे पाच हजार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय शनिवारी घेतला.
जळगाव रोडवरील मराठा मंदीर मंगलकार्यालयात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी दोन शिव्या घातल्या तर शासनाने त्यांच्यावर एसआयटी नियुक्त केली. मराठा समाजाला यापूर्वी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही, असे असताना पुन्हा तसेच ५० टक्केबाहेर आरक्षण माथी मारण्यात आले. हे आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी नाकारल्याने त्यांच्याविरोधात सरकारने षडयंत्र रचलण्यास सुरवात केल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. जरांगे पाटील यांच्यावर करीत असलेल्या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान चार उमेदवार याप्रमाणे एका तालुक्यातून प्रत्येकी एक हजार याप्रमाणे पाच तालुक्यातून एकूण पाच हजार उमेदवार मराठा समाज उभे करणार आहे.
सर्वच राजकीय पक्षाचे आमदार खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे म्हणतात पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची त्यांची भूमिका चुकीची आहे. कारण राज्य मागास आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला असेल तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे आणि यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
राजकीय पक्षांच्या मोर्चा, सभा, बैठकांवर बहिष्कार
कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभा असो किंवा मोर्चा, बैठकांवर मराठा समाजाने बहिष्कार घालवा, अथवा निषेधाचे फलक घेऊन उभे राहावे असा निर्णय आज घेण्यात आला. यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि गावागावांत मराठा समाजाच्या बैठका घेण्याचेही यावेळी सर्वानुमते ठरले.