मद्यपींना प्रत्येकी ५, ढाबा मालकास ५० हजार रुपये दंड
By राम शिनगारे | Published: December 11, 2022 08:23 PM2022-12-11T20:23:28+5:302022-12-11T20:23:44+5:30
प्रथमवर्ग न्यायलयाकडून दंड : राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी
औरंगाबाद: राज्य उत्पादन शुल्कच्या 'क' विभागाने फुलंब्री- सिल्लोड रस्त्यावरील ढाब्यावर मारीत अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाबामालकासह पाच मद्यपींना पकडले. या आरोपींच्या विरोधात फुलंब्री प्रथमवर्ग न्यायालयात दोषराेपपत्र सादर केले. तेव्हा न्यायालयाने मालकास ५० हजार तर मद्यपींना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
फुलंब्री- सिल्लोड रस्त्यावरील हॉटेल साईराज ढाबा याठिकाणी दुय्यम निरीक्षक एस.एस. पाटील यांच्या पथकाने १५ नोव्हेंबर रोजी छापा मारला. हॉटेल मालक सुरेश रंगनाथ वाघ (रा महालकिन्होळा, ता. फुलंब्री) हा अवैध दारू विकताना पकडला. तर पाचजण दारू पिताना आढळले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी फुलंब्री न्यायालयाने वाघ यास ५० हजार, मद्यपींना प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकुण ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दुसऱी कारवाई हॉटेल अंबिका (पिशोर, ता. कन्नड) याठिकाणी ६ डिसेंबर रोजी केली. हॉटेल मालक भानुदास गाेविंद मोकासे (रा. पिशोर) यास अवैध दारू विकताना, पाच ग्राहकांना दारू पिताना पकडले. या आरोपींच्या विराेधात कन्नड प्रथमवर्ग न्यायालयात ९ डिसेंबर रोजी आरोपपत्र सादर केले. न्यायालयाने मालक मोकासे यास २५ हजार, मद्यपींस प्रत्येकी हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कामगिरी निरीक्षक नारायण डहाके, दुय्यम निरीक्षक एस.एस.पाटील, एस.डी. घुले, जहवान मयूर जैस्वाल, किशोर ढाले, मोतीलाल बहुरे, श्रावण खरात यांच्या पथकाने केली.
सहा दिवसात आरोपींना शिक्षा
राज्य उत्पादन शुल्कचे अपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या नेतृत्वातील पथकाने तिसगाव शिवारातील हॉटेल संदीप याठिकाणी २ डिसेंबर रोजी छापा मारला. मालक करण जालिंदर पाटील हा ग्राहकांना मद्यपींसाठी सेवा पुरविताना आढळला. त्याच्यासह इतर ७ मद्यापींच्या विरोधात गुन्हा नोंदवित ९ डिसेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. न्यायालयाने मालकास २५ हजार, मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपये असा एकुण २८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. सहा दिवसात आरोपींना शिक्षा देण्यात आली. ही कामगिरी उपअधीक्षक प्रदीप पोटे, दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, बी.ए.दौड, जी.एस.पवार, बी.आर. वाघमोडे, एस.बी.रोट यांच्यासह जवानांनी केली.