पहिल्या फेरीत ५ हजार विद्यार्थ्यांनीच घेतला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:18 AM2018-07-10T01:18:12+5:302018-07-10T01:18:37+5:30
अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यातील केवळ ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यातील केवळ ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला.
५ जुलै रोजी जाहीर झालेल्या पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत ६ ते ९ जुलैपर्यंत देण्यात आली होती. आता राज्य सरकारने या पहिल्या फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ दिली. मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण उपसंचालक विभागाने अकरावी प्रवेशाच्या दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीत जाहीर ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांपैकी सोमवारी सायंकाळपर्यंत ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर ४ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही, असे विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पसंती देऊ शकतात. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक मधुकर देशमुख यांनी दिली. महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २८ हजार ७३५ एवढी असून, त्यासाठी १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनीच आॅनलाईन अर्जाचे दोन्ही भाग भरले आहेत. यातच पहिल्या फेरीतही कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे रिक्त जागांचा आकडा पंधरा हजारांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.