'महिलांना तिकिटात ५० टक्के सुट दिल्याने व्यवसाय बुडाला; काळीपिवळीचा सर्व टॅक्स माफ करा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 04:35 PM2023-03-29T16:35:40+5:302023-03-29T16:37:01+5:30
खाजगी वाहतुकदारांचे जोरदार निदर्शने; एसटीत महिलांच्या हाफ तिकीट योजनेस फुल प्रतिसाद मिळत असल्याने खाजगी प्रवाशी वाहतूक करणारे काळीपिवळी चालक मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
पैठण : खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना परिवहन करात शंभर टक्के सवलत द्यावी अशी मागणी करत बुधवारी मराठवाडा टँक्सी युनियनच्या वतीने पैठण तहसील कार्यालया समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. एसटीत महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिल्याने खाजगी प्रवाशी वाहतुकीवर गदा आली आहे.
एसटीत महिलांच्या हाफ तिकीट योजनेस फुल प्रतिसाद मिळत असल्याने खाजगी प्रवाशी वाहतूक करणारे काळीपिवळी चालक मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पैठण ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान रोज ८० काळीपिवळी जीप प्रवाशी वाहतूक करतात. दररोज दोन ट्रीप होत असताना महिलांना एसटीत सवलत दिल्यानंतर आता तीन दिवसात एक ट्रिप होत असल्याने व्यवसाय संकटात सापडला असल्याचे मराठवाडा टँक्सी युनीयनचे कार्याध्यक्ष ईकबाल शेख यांनी सांगितले. काळीपिवळी चालविण्यासाठी वर्षभरात ६० हजार रूपये कर भरावा लागतो. राज्य सरकारने किमान हा कर माफ करून आम्हाला दिलासा द्यावा, सरकारने आमच्या मागण्याचा विचार केला नाही तर आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर येणार आहे, अशा प्रतिक्रिया युनीयनचे अध्यक्ष रहीम चॉंद शेख यांनी या वेळी व्यक्त केली.
आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी भेट देऊन काळीपिवळी चालक मालकांच्या मागण्या बाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मराठवाडा टँक्सी युनियनच्या वतीने तहसीलदार शंकर लाड यांना निवेदन देण्यात आले. अंदोलनात युनियनचे अध्यक्ष रहीम शेख, समिर पठाण, राजु गव्हाने, राजेंद्र डोंगरे, एकबाल शेख, हसन शेख,दादासाहेब जांभळे, मिनाज शेख, हबीब धांडे, प्रकाश लिबोरे, सलिम शेख,शोएब शेख, बजरंग पठाडे, सुनिल निळ, देविदास शेळके, जालिंदर चव्हाण , ईम्रान शेख, अमर टाक, तौफिक मुसा, कल्याण ताकवाले, अलिम पठाण, शौकत पठाण, रमेश लाहोटी, संजय शिंदे, बुढन कुरैशी, कलीम पठाण, प्रकाश शेळके, योगेश चव्हाण आदीसह मोठ्या संख्येने काळीपिवळी चालक व मालक सहभागी झाले होते.
एसटीच्या संपात आम्ही साथ दिली
एसटीने संप पुकारल्या नंतर राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत चार महिने प्रवाशी वाहतूक करून आम्ही सरकारला साथ दिली. आता सरकार मुळेच आमच्यावर वाईट वेळ आली असून सरकारने आमचा विचार करावा अशी अपेक्षा मराठवाडा टँक्सी युनियनचे कार्याध्यक्ष ईकबाल ईस्माईल शेख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.