निवडणुकीवेळी चंद्रकांत खैरेंना मीच 50 लाख दिले, बंडखोर आमदाराने डागली तोफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:59 PM2022-07-22T17:59:22+5:302022-07-22T18:06:20+5:30
औरंगाबादमधील 5 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिंदे गट विरुद्ध औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी मेळावे घेत बंडखोरांविरुद्ध हल्लाबोल केला आहे.
औरंगाबाद - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतर नाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. त्यानंतर, आता खासदारांच्या बंडानंतरही पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगला आहे. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैर आणि अंबादास दानवे विरुद्ध बंडखोर आमदार असा वाद पुढे येत आहे. त्यावरुनच, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी चंद्रकांत खैरेंना मी 50 लाख दिल्याचे म्हटले. तसेच, मी तुमच्या घरावर आल्यास तुमचे कपडे उतरले जातील, असेही ते म्हणाले.
औरंगाबादमधील 5 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिंदे गट विरुद्ध औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी मेळावे घेत बंडखोरांविरुद्ध हल्लाबोल केला आहे. त्यातच, खैरे यांनी रमेश बोरणारे यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकनाथ शिंदेंनी 2 कोटी रुपये दिल्याचेही भाषणात सांगितले. त्यावरुन, आता खैरे विरुद्ध बोरणारे असा वाद पेटला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज वैजापूर येथे शिवसंवाद यात्रेनिमित्त येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बोरणारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना खैरेंना इशाराच दिला.
माझ्यासारखा सामान्य माणसावर आरोप केला जातो, तेही माझ्या मुलीच्या लग्नात पैसे दिल्याचा. मी म्हणतो जर एकनाथ शिंदे यांनी माझ्या मुलीच्या लग्नासाठी 1 कोटी रुपये दिले असतील तर मी त्याच स्वागत करतो. एक नेता आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत करत असेल तर त्याच कौतुकच केलं पाहिजे.मी काय भिकारी नाही. मी गरीब शेतकरी नेता म्हणून लोकांमध्ये वागतो. पण, माझ्या विधानसभेत निवडणुकावेळीची माझी संपत्ती 18 कोटी एवढी होती.
खैरेंकडे माझे 50 लाख रुपये
मीही अनेक कार्यकर्त्यांच्या लग्नकार्यात मदत केली आहे. चंद्रकांत खैरेनी 20 वर्षे खासदारकी भोगली. मी तीनवेळा वैजापूरचा प्रचार केला. वैजापूरसाठी खैरे फक्त 50लाख देत, दुसरीकडे 2 कोटी द्यायचे. खैरेच्या निवडणुकीसाठी मी 50 लाख दिले, आजही त्यांच्याकडे हिशोब फिरतो. खैरेनी माझ्या घरावर यावं, मी जेव्हा त्यांच्या घरावर जाईल, खैरेचे कपडे उतरवील, अशा शब्दात रमेश बोरनारे यांनी खैरेना इशारा दिला. दरम्यान, खैरेचा एवढा साठा, इतिहास आमच्याकडे आहे. मी त्यांच्याकडून एक रुपयाही घेतला नाही, याउलट 2019 च्या निवडणुकीत मीच त्यांना 50 लाख दिले.