महा ई -सेवा केंद्र देण्याच्या नावाखाली ५० लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:01 AM2017-10-18T01:01:27+5:302017-10-18T01:01:27+5:30
महा ई -सेवा केंद्र देण्याच्या नावाखाली महाराष्टÑासह ९ राज्यांत ८० जणांना गंडा घालणा-या महाठगास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलच्या शाखेने नागपूर येथून अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महा ई -सेवा केंद्र देण्याच्या नावाखाली महाराष्टÑासह ९ राज्यांत ८० जणांना गंडा घालणा-या महाठगास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलच्या शाखेने नागपूर येथून अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी सांगितले की, शेखर ओंकारप्रसाद पोद्दार (३२, रा. पटका नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्यास न्यायालयात उभे केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शेखरला पकडल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश व नागपूर पोलीस औरंगाबादेत येणार असल्याची माहिती देण्यात आली. रमेश गणेश कुलकर्णी (बाभूळगाव, ता. फुलंब्री) याने २ आॅगस्ट २०१७ ला वडोदबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १० जुलैला एक संदेश मोबाइलवर आला. त्यात आधार कार्ड पोर्टल, बस, रेल्वे, विमान, ई-तिकिटिंग, सर्व प्रकारचे बिल भरणा केंद्र यासह जन्म, रहिवासी, जातीचे दाखले वेबसाइटवरून काढता येतील त्यासाठी वेबसाइटवर संपर्क करण्यास सांगून मोबाइल नंबर आणि महा-ई-सेंटरच्या वेबसाइटचा पत्ता दिला होता.
मोबाइलवर रमेश याने संपर्क केला त्यावेळी त्यास १५ हजार १०० रुपये भरण्यास सांगितले होते. रमेश याने रक्कम खात्यात भरली व नंतर महासेवा केंद्रासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाल्यावर गोलमोल उत्तरे देऊन तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे रमेश याने वडोदबाजार पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार देऊन घडलेला प्रकार सांगितला.
रविवारी कारवाई...
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी अभ्यासपूर्वक तपास सायबर सेलकडे सोपविला. उपअधीक्षक अशोक आमले, फौजदार सैयद मोसीन, प्रमोद भिवसने, पोलीस कर्मचारी दत्ता तरटे, रवी लोखंडे, प्रेम म्हस्के, भूषण देसाई, योगेश तरमले, योगेश दारवंटे, गजानन बनसोड यांच्या पथकाने दोन महिने तपास केला. तेव्हा आरोपीचा पत्ता अखेर नागपूर येथे मिळाला. त्यावरून आरोपी शेखर पोद्दार यास छापा मारून अटक करून औरंगाबादेत आणले.
‘तो’ फक्त आठवी शिकलेला...
आरोपी शेखर पोद्दार याचे चार बँक खाते असून, तो केवळ आठवी पास आहे. तो लॉटरीच्या धंद्यात फसला होता तेव्हापासून दुस-याला ठगवू लागला. रमेश कुलकर्णीसह महाराष्टÑाच्या २६ व उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, पंजाब, ओडिसा, आंध्र प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत ८० लोकांना फसविल्याची माहिती समोर आली आहे. पटका, नागपूर येथे देखील त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूपीतही ३ गुन्हे दाखल आहेत. यावेळी पत्रपरिषदेला पोलीस उपअधीक्षक अशोक आमले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, फौजदार सैयद मोसीन आदींची उपस्थिती होती.